म्हापसा - नाताळ तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कळंगुट किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून वाहतुकीची होणारी कोंडी टाळून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी गोव्याबाहेरुन कळंगुट भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. हा निर्णय मध्यम तसेच अवजड वाहनांसाठी असून हा निर्णय २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.
या काळात येणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी व त्यात सुसूत्रता आणून तोडगा काढण्याच्या हेतूने आमदार मायकल लोबो यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी २० डिसेंबरनंतर बागा, कांदोळी, कळंगुट सिकेरी या किनारपट्टी भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच मोठी असते. त्यातून वाहतुकीची कोंडी होत असते. मागील तीन दिवसांपासून सिकेरी पासून ते बागापर्यंतच्या भागात आलेल्या पर्यटकांमुळे प्रचंड प्रमाणावर कोंडी झाली असल्याने त्याचे त्रास स्थानिकांना सहन करावे लागतात. त्यांना घराबाहेर पडणं मुश्किल होवून जाते. त्यावर तोडगा काढण्यासाठी उपसभापती मायकल लोबो यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
बैठकीला कळंगुटचे वाहतूक निरीक्षक, पोलीस स्थानकाचे निरीक्षक, वाहतूक खात्याचे अधिकारी, कळंगुट, कांदोळी पंचायतीचे सरपंच तसेच इतर पंचसदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी बैठकीला वाहतुकीच्या व्यवस्थापना संबंधी आपले विचार व्यक्त केले. वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोव्याबाहेरील मध्यम तसेच अवजड वाहनांना कळंगुट भागात प्रवेश नाकारण्यात येणार. कळंगुटच्या सीमेवर वाहनांच्या पार्किंगसाठी सोय केली जाणार असून त्यातून पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांना इच्छुक स्थळी जाण्यासाठी तात्पुर्ती शटल सेवेची सोय केली जाणार आहे. २४ डिसेंबर पासून कळंगुट परिसरातील काही मार्ग एकेरी करण्यात येणार आहेत. तसेच २९ ते १ जानेवारीपर्यंत सुद्धा काही मार्ग एकेरी केले जातील.
यावेळी लोबो यांनी चुकीच्या जागी वाहने पार्क करुन वाहतुकीस अडथळे निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक खात्याला दिले आहेत. तसेच सिकेरी परिसरातीलही वाहनांवर कारवाई करावी असेही लोबो यांनी खात्याला सांगितले आहे. भाडेपट्टीवर वाहने देणारे वाहन चालक सुद्धा रस्त्यावर वाहने पार्क करतात त्यांच्यावरही कारवाईचे संकेत बैठकीत देण्यात आले.
वाहतूक निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी या काळात वाहतुकीचा आढावा घेतल्यानंतर योग्य ते निर्णय घेतले जाणार असल्याचे बैठकीत सांगितले. वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंगुट परिसरात तीन पाळ्यांवर पोलीस तैनात केले जातील. तसेच अतिरिक्त पोलिसांची सुद्धा नेमणूक केली जाणार असल्याची माहिती दिली. कांदोळी तसेच कळंगुट पंचायतीकडून ट्रॅफिक वॉर्डनचा वापर केला जाणार असल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.