पणजी : विरोधकांमधील गोेंधळ, बेशिस्त आणि बेदिलीचा लाभ उठवण्यासाठी ऐनवेळी जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा डाव खेळलेल्या सरकारला परिस्थिती सर्वार्थाने अनुकूल नसल्याचा अंदाज येऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या समर्थकांना पक्षाचे चिन्ह दिले नसले तरी, स्थानिक नेत्यांनी पक्षसमर्थक उमेदवारांच्या मागे पद्धतशीरपणे जोर लावला आहे. अपक्ष आमदारांनाही आपापल्या प्रभाव क्षेत्रात भाजपच्या तोडीस तोड प्रचार यंत्रणा राबवली असल्याने निवडणूक सरकार पक्षाच्या अपेक्षानुरूप एकतर्फी होण्याची शक्यता मावळली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदारांनी प्रचारकार्यात पूर्णवेळ झोकून दिले असतानाच भाजपवर काही ठिकाणी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांना प्रचारात उतरवण्याची वेळ येणे, ही बोलकी घटना असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. भाजपची स्थिती जिथे दोलायमान आहे, तिथे पर्रीकरांनी प्रचार केला. असंतुष्टांना मागे खेचण्याचा प्रयत्नही या दरम्यान झाल्याचे वृत्त असून असंतोषाचे पर्यवसान विरोधी मतदानात होऊ नये, यासाठी नेते कामाला लागले आहेत. राजकीय नेत्यांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. दक्षिणेत खोल, पैंगीण भागात मंत्री रमेश तवडकर यांना आव्हान निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. केपेतील शेल्डे, बार्से मतदारसंघांमध्येही चुरशीच्या लढती होतील. सावर्डे मतदारसंघात भाजप उमेदवार सुवर्णा तेंडुलकर यांच्यासमोर अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. मगो-भाजप युती असली तरी, काही मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते थेट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. सांकवाळमध्ये अपर्णा नाईक मगोतर्फे रिंगणात असल्या तरी, भाजपचे मंडल अध्यक्ष तुळशीदास नाईक अपक्ष म्हणून निवडणूक लढवताहेत. सांताक्रुझ आणि चिंबल या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या एका नेत्याकडून मगो उमेदवारांच्या विरोधात काम चालू केले असल्याचे तसेच बाबूश मोन्सेरात यांच्या उमेदवारांना तो समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
चुरस कायम!
By admin | Published: March 17, 2015 1:37 AM