पणजी : लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीच्या कथित लाच प्रकरणात माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी विशेष न्यायालयात केलेला दुसरा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर करेपर्यंत त्यांना कोलवाळ तुरुंगातच राहावे लागणार आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे, तर इतर दोन संशयितांना जामीन मिळाला आहे. एकाच प्रकारचा ठपका ठेवण्यात आलेल्या म्हणजेच भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे न्यायदानाच्या ‘समानता’ या तत्त्वावर चर्चिलनाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती; परंतु हा निकष त्यांना काही कारणांमुळे लागू होत नसल्याचे स्पष्ट करून त्यांना जामीन नाकारला आहे. तसेच समानता हा जामिनासाठी एकमेव निकष नसतो, असेही म्हटले आहे. एकदा न्यायालयाने जामीन नाकारला तर त्याच न्यायालयात दुसऱ्यांदा अर्ज करण्यासाठी या प्रकरणात काहीतरी महत्त्वाचा बदल घडलेला आवश्यक असतो; परंतु तसा बदल दाखविण्यात अर्जदाराच्या वकिलाला अपयश आल्याचे आदेशात म्हटले आहे. कामत यांना मिळालेला अटकपूर्व जामीन, हे देण्यात आलेले एकमेव कारण परिस्थिती बदलल्याचे मानायला न्यायमूर्ती भारत देशपांडे यांनी नकार दिला. चर्चिलव्यतिरिक्त या प्रकरणात सर्वात अगोदर अटक करण्यात आलेले संशयित जैकाचे माजी प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर हे तुरुंगात आहेत, तर कथित हवाला एजंट रायचंद सोनी व लुईस बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चर्चिल तुरुंगातच!
By admin | Published: August 25, 2015 1:21 AM