पणजी : लुईस बर्जर-जैका लाचप्रकरणी संशयित माजी मंत्री चर्चिल आलेमाव, जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांचा जामीन नाकारण्यात आला. पणजी विशेष न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. या प्रकरणातील तिसरे संशयित सत्यकाम मोहंती यांना सशर्त जामीन मंजूर केला. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ रोजी निवाडा होणार आहे. कंत्राट देण्यासाठी लुईस बर्जर कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप असलेले चर्चिल आलेमाव यांचा जामीन अर्ज निकालात काढला. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे जामिनासाठी त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. या प्रकरणात सर्वात अगोदर अटक केलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आनंद वाचासुंदर यांचाही जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात पैसे पुरविण्याचे काम केल्याचा आरोप असलेला हवाला एजंट रायचंद सोनी याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बुधवारी त्याच्या अर्जावर निवाडा होणार आहे. दिगंबर यांची चार तास चौकशी दिगंबर कामत यांची क्राईम ब्रँचकडून सोमवारी चार तास चौकशी करण्यात आली. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. कामत ४ वाजता क्राईम ब्रँचमध्ये पोहोचले. तपास अधिकारी दत्तगुरू सावंत यांनी त्यांची चौकशी करून जबाब नोंदविला. त्यांच्याविरोधात पुरावा नाहीसा करण्याचा गुन्हा नोंदविल्यानंतरची त्यांची ही पहिली चौकशी होती. (पान २ वर)
चर्चिल कोठडीतच
By admin | Published: August 18, 2015 1:38 AM