फोंडा- मडकई मतदार संघातील नागरिकांसाठी आरोग्य विषयक सुविधा आम्ही पूरवत आलो आहोत. लोकांनी आरोग्याच्या तक्रारीकडे कधीच हेळसांड करू नये. आरोग्य सुधारणा संदर्भात सरकारच्या ज्या योजना आहेत, वेळीच्या वेळी त्यांचे नूतनीकरण करून घ्या. असे आवाहन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
ढवळी येथील सत्यनारायण देवालयाच्या मंडपाचे तसेच इतर परिसराचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, उद्योजक देवेंद्र ढवळीकर, सत्यनारायण देवस्थानचे अध्यक्ष यशवंत नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंता सुधीर परब, सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर , तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना ढवळीकर पुढे म्हणाले की 'मडकई मतदार संघातील महिलांच्या कर्करोग निदान साठी फर्मागुडी येथील दिलासा इस्पितळाशी माधवराव ढवळीकर ट्रस्टने करार केला आहे. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने महिलांनी सदर मोफत तपासणी करून घ्यावी. राज्य सरकारने आरोग्याच्या काही व्याधीवर उपचारासाठी आरोग्य कार्ड केले आहे. पण मडकई मतदार संघातील काही कुटुंबांनी या आरोग्य कार्डाचे अद्याप नूतनीकरण केलेले नाही. सध्या कवळे पंचायत क्षेत्रात यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. तेव्हा लोकांनी त्वरित आपली कार्डे नूतनीकरण करून घ्यावीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय परुळेकर यांनी केले तर यशवंत नाईक यानी आभार मानले. असावरी भिडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.