पणजी : गोवा मुक्तीदिन सोहळ्याचे कार्यक्रम राज्यात वर्षभर होणार आहेत. पूर्णपणे गोमंतकीय कलाकार, वक्ते आदी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. गोव्यातील केवळ साडेचार वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीवर उहापोह होईल. विविध उपक्रमांमधून व कार्यक्रमांमधून सर्व विषयांबाबत उत्तरे मिळतील. नेहरूंच्या विषयासह इतिहासाशीनिगडीत अन्य सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.
दक्षिणायान अभियानाने पंडित जवारहाल नेहरूंविषयीचा एक मुद्दा उपस्थित केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविद हे येत्या १९ रोजी गोवा भेटीवर येत आहेत. नेहरूंमुळे गोवा चौदा वर्षे उशिरा मुक्त झाला असा चुकीचा दावा भाजपचे काही नेते करतात व त्यामुळे राष्ट्रपतींनी याबाबत खरा इतिहास लोकांसमोर मांडावा किंवा नेहरूंच्या भूमिकेविषयी स्पषटपणे बोलावे अशी अपेक्षा अभियानाने व्यक्त केली आहे. पत्रकारांनी गुरुवारी याविषयी मुख्यमंत्री सावंत यांना विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की सर्व विषयांबाबतची उत्तरे येत्या वर्षभरातील कार्यक्रमांमधून, चर्चा व परिसंवादांमधून मिळतील. गोवा मुक्तीचे साठावे वर्ष आम्ही साजरे करतोय. गोव्याचा इतिहास हा केवळ साडेचारशे वर्षांची पोर्तुगीज राजवट एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याही पुढे जाऊन विचार करावा लागेल. त्याही पुढील काळाविषयी चर्चात्मक कार्यक्रम होतील. गोव्यात अनेक राजवटी आल्या व गेल्या, त्याविषयी बोलले जाईल. त्या सर्व उपक्रमांमधून सगळ्या विषयांबाबत स्पष्टीकरण मिळेल.
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा मुक्ती सोहळ्यासाठीच्या बोधचिन्हाचे प्रकाशन केले. मुख्यमंत्री म्हणाले, की सर्वांनी गोव्यात राष्ट्रपतींचे स्वागत करायला हवे. काहीजणांनी राष्ट्रपतींना पत्रे लिहिली, पत्रकार परिषदांमधून भूमिका मांडली. आपण पत्रे वाचली आहेत. जे गोमंतकीय राष्ट्रवादी विचारांचे आहेत, त्यांनी राष्ट्रपतींचे गोव्यात खुल्या मनाने स्वागत करावे, त्यांना गोव्यात बोलवावे. आम्ही गोमंतकीय असलो तरी, आम्ही सगळे राष्ट्रवादी विचारांचे आहोत. गोवा मुक्तीचा सोहळा वर्षभर साजरा करताना सर्वांनीच उत्साहाने त्यात सहभागी व्हावे.