पणजी - काँग्रेस हाऊसवर मोर्चा नेणे आणि मग तिथे महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालणे, महिलांसमोर आक्रमकपणे वागणे व दोनशे भाजपा कार्यकर्त्यांना महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आदी केवळ चौदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी खंबीरपणे सामोरे जाणे या सगळ्याची चर्चा गेले चार दिवस गोव्यात सर्वत्र सुरू आहे. महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जे धैर्य दाखविले व जी गांधीगिरी केली त्याचे कौतुक राजकारणाशी संबंध नसलेले लोक देखील करू लागले आहेत. भाजपाचे पुरुष नेते, पुरुष पदाधिकारी महिला काँग्रेससमोर फिके ठरल्याची लोकभावना निर्माण झाली आहे.
भाजपामधीलही एका गटाला महिला काँग्रेसशी हुज्जत घालण्याचा प्रकार आवडलेला नाही. यापुढे भाजपाची जेव्हा बैठक होईल तेव्हा त्याविषयी चर्चा होईल, जनमानसात आमच्या मोर्चावेळच्या हाराकिरीमुळे चुकीचा संदेश गेला, असे भाजपाचे काही पदाधिकारी व दोन आमदारही बोलून दाखवू लागले आहेत. राफेलप्रश्नावरून काँग्रेस हाऊससमोर मोर्चा न्यावा एवढेच ठरले होते पण तिथे जाऊन महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी थेट भांडण करावे असे ठरले नव्हते, अशी चर्चा भाजपामधील काही जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या गटात सुरू झाली आहे. निदान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तरी महिला काँग्रेसशी भांडण झाले तेव्हा पुढे राहायला नको होते,अशी चर्चा भाजपाच्या आतिल गोटात सुरू आहे.
महिला काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती प्रतिमा कुतिन्हो यांचे आणि अन्य महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचे महत्त्व भाजपाच्याच कृतीमुळे वाढले. आपल्यावर भाजपाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला अशी तक्रार महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कुतिन्हो यांनी केली आहे. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या दोनशे भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यामुळे पळून गेल्या नाहीत. त्यांनी धिरोदात्तपणे सामना केला. याविषयी आपण महिला काँग्रेसचे कौतुक करतो, असे दिगंबर कामत, रवी नाईक आदी माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून प्रतिमा कुतिन्हो व इतर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक केले. भाजपाचा महिला मोर्चा फिका ठरला व सगळे श्रेय काँग्रेस महिला काँग्रेसच घेऊन गेली,असे राजकीय विश्लेषकही नमूद करत आहेत.