लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ रोजी लागेल. गोव्यातील कोणत्या मंत्र्याने व आमदाराने प्रचार काम नीट केले होते व कुणी केले नाही, हे निकालातून कळेलच; मात्र सरकारमधील काही मंत्री सध्या ज्या पद्धतीने बोलू लागलेत, ते पाहता निकालानंतर बरेच काही घडू शकते, असे म्हणण्यास वाव आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी काल-परवा काही विधाने केली आहेत. अर्थात गावडे हे निवडणुकीविषयी बोलले नाहीत; पण एका सरकारी खात्यावर जाहीरपणे जबरदस्त दुगाण्या झाडत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
तशातच सभापती रमेश तवडकर यांना यापुढील काळात मंत्रिपद मिळू शकते, अशा चर्चेचे पिल्लू काहीजणांनी सोडून गावडे यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे; पण गावडे यांनी त्याबाबत चिंता केलेली नाही. मंत्रिमंडळाची फेररचना होईल या फक्त अफवा आहेत, असे त्यांना वाटते. तो विषय वेगळा आहे; पण गावडे यांनी 'लोकमत'च्या प्रतिनिधीशी बोलताना पक्षाच्या नेतृत्वाविषयीही विधान केले आहे. आपल्याविरुद्ध राजकारण चाललेय; पण पक्षाचे नेतृत्व त्याबाबत गप्पच आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तवडकर व माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी एकत्र येऊन प्रियोळ मतदारसंघात श्रमधामच्या नावाखाली काही घरे बांधण्याचे काम हाती घेतले. आपल्याला त्यावेळी डावलले गेले, अशी गावडे यांची भावना झाली असून, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा संघर्ष वाढू शकतो.
मंत्री गावडे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्धच आहेत. आपले विचार बेधडक बोलून दाखवतात. उटा संघटनेचा प्रेरणा दिन कार्यक्रम शनिवारी फोंड्यात झाला. त्यावेळी गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याला शाब्दिक फटके दिले. एसटी समाजबांधवांच्या मागण्या मान्य होत नाहीत, त्यांना खात्याकडून न्याय मिळत नाही, अशी खंत गावडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. काही अधिकारी रात्री मद्यप्राशन करतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हँग ओव्हरमध्ये असताना काम करू शकत नाहीत, असे मंत्री गावडे थेट बोलले आहेत. एसटी समाजाचा वापर केवळ मतांसाठी केला जाऊ नये. पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ समाजबांधवांवर आणू नका, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
मंत्री म्हणजेच सरकार असते; मात्र प्रशासनस्तरावरून जलदगतीने कामे होत नाहीत असे जेव्हा एखाद्या मंत्र्याला वाटू लागते, तेव्हा सब कुछ ठीक नहीं है, हे कळून येतेच. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आदिवासी कल्याण खाते आहे. हे खाते मुद्दाम मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना सोपवलेले नाही. या खात्याकडून सभापती तवडकर कामे करून घेतात; मात्र गावडे यांची कामे या खात्याकडून केली जात नसावीत, अशी शंका लोकांना येते. मंत्री गावडे यांनी मनातील उद्रेक कडक शब्दांत व्यक्त केला आहे. एसटी बांधवांवर कुणी अधिकारी मुद्दाम अन्याय करीत असतील, तर मुख्यमंत्री सावंत यांना त्याकडे लक्ष द्यावे लागेल. अधिकाऱ्यांना व एकूणच खात्याला सक्रिय करावे लागेल.
गोविंद गावडे म्हणतात की, आपण एसटी समाजबांधवांमध्ये जो रोष आहे, तो आपण मांडत आहे गावडे यांचे म्हणणे खरेच आहे; पण त्यांच्याविरोधात राजकारण करण्यासाठी काही राजकारणी हाच रोष वापरात आणण्याची शक्यता आहे. शनिवारी प्रेरणा दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री सावंत उपस्थित नव्हते. याबाबत 'उटा'च्या काही नेत्यांनीही खंत व्यक्त केली आहेच. मुख्यमंत्री मुद्दाम प्रेरणा दिन कार्यक्रमापासून दूर राहिले की काय, अशी शंका लोकांना येते. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी एसटी बांधवांसमोर भूमिका मांडण्याची गरज आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच भाजप नेते एसटी समाजबांधवांना गोंजारत होते. मतदान झाल्यानंतर आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. तवडकर यांचा श्रमदान कार्यक्रम खरोखरच चांगला आहे, गरजूंना घरे बांधून देण्याचे दैवी कामच ते करीत आहेत. काणकोणप्रमाणेच प्रियोळमध्येही हे काम होत आहे; मात्र याकामी चक्क दीपक ढवळीकर यांनाही तवडकर यांनी सोबत घेतल्याने गावडे यांच्या संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे.