पणजी : फुटिरांना धडा शिकवून लोकांनी राजकारण स्वच्छ व शुद्ध करावे, अशी परखड प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे दिली आहे. मांद्रे मतदारसंघातील जनता तर स्वाभिमानी असून त्यांच्याकडून निश्चितच योग्य तो निर्णय घेतला जाईल हे मला सध्या येत असलेल्या विविध फोन कॉल्सवरून स्पष्ट होते, असे पार्सेकर म्हणाले.सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा व आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटल्यानंतर या दोघांनीही काँग्रेसच्या आमदारकीवर पाणी सोडले. सोपटे हे काँग्रेसतर्फे लढताना मांद्रे मतदारसंघात गेल्या निवडणुकीवेळी पार्सेकर यांचा पराभव करून निवडून आले होते.पार्सेकर लोकमतशी बोलताना म्हणाले, की प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी सकाळी मला दिल्लीहून फोन केला व घटना सांगितली. त्यांना काय सांगायचे ते मी सांगितले आहे. पार्सेकर म्हणाले, की लोकांनीच आता फुटिरांना काय ते विचारावे. पाच वर्षांसाठी त्यांना जनतेने निवडून दिले होते. केवळ दीड वर्ष झाल्यानंतर ते का फुटले हे त्यांनीच सांगावे. गोव्याचे राजकारण शुद्ध करण्यासाठी लोकांनी फुटिरांना धडा शिकवावा व लोक शिकवतीलही.पार्सेकर म्हणाले, की ज्या काळात भाजीपाव पक्ष अशी भाजपाची संभावना व हेटाळणी होत होती, त्यावेळेपासून आम्ही भाजपाचे काम करत आलो. आमची अनामत रक्कम जप्त व्हायची, पण आम्ही कधी चलबिचल झालो नाही. कधीच दुस-या पक्षात जाण्याचा विचार देखील आमच्या मनात आला नाही. मात्र आता निवडून येणारे आमदार सहज लोकांनाही गृहीत धरून पक्ष बदलतात. सोपटे तर मांद्रे मतदारसंघाचा विकास होत आहे, असे गेले दीड वर्ष सांगत होते. आपण विरोधात आहे असे आपल्याला वाटतच नाही, असेही सोपटे म्हणत होते. गेल्यावेळीही ते आपल्याला विश्वजितने भाजपमधून काँग्रेसमध्ये नेले असे म्हणत होते व आताही ते साधारणत: तसेच म्हणत असावेत. लोक त्यांना जाब विचारतील.
लोकांनी फुटिरांना धडा शिकवून राजकारण स्वच्छ करावे : पार्सेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 4:15 PM