काशिराम म्हांबरे, म्हापसा: फसवणूक व बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या कथित आरोपाखाली सडये-शिवोली येथील फाइव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरू डॉम्निक डिसोझा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
बेकायदा धर्मांतरण प्रकरणात सोमवार १ जानेवारी रोजी अटक झाल्यानंतर डॉम्निक यांना अस्वस्थ वाटत असल्यानेयेथील जिल्हा इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांनी म्हापशातील प्रथम वर्ग न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. केलेल्या अर्जावरील सुनावणी काल बुधवारी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानेआपला निर्णय राखून ठेवला होता.
डॉम्निक डिसोझा यांना २० हजार रुपयांची वैयक्तीक हमी तसेच तेवढ्याच रक्कमेच्या हमीदारावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच तपास कार्यात पूर्ण सहकार्य करण्याचेआदेशही न्यायालयाने दिलेआहेत. फोंडा येथील ४० वर्षीय तरुणाच्या तक्रारीनुसार म्हापसा पोलिसांनी संशयित डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जोआना मास्करेन्हास व अज्ञात विरुद्ध बेकायदा धर्मांतरण प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली. याच गुन्हा खाली डॉम्निक डिसोझा याला झालेली ही तिसरी अटक होती.