लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गाजलेल्या कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणानंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रसार माध्यमांशी प्रथमच भाष्य करताना असा आरोप केला आहे की, माझा आवाज क्लोन करुन बनावट ऑडिओ क्लीप तयार करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. एका एनजीओने तसेच पोलिस अधिकारी आदी जबाबदार व्यक्तींनी मला याबाबत सतर्क केले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अ. भा. काँग्रेस कार्यकारीणीवरील कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी व्टीटव्दारे कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आणल्यानंतर मंत्री माविन यांच्या कार्यालयातून पोलिस तक्रार करण्यात आली होती. त्यात मंत्री माविन यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच हा सर्व प्रकार चालू असल्याचे म्हटले होते.
या तक्रारीबद्दल माविन यांना विचारले असता ते म्हणाले की, मुळात जी गोष्ट घडलेलीच नाही ती घडली आहे, असा दावा करणे व सोशल मिडियावरुन दुसऱ्याची बदनामी करणे हे संतापजनक आहे. मला कळत नाही किती खालच्या स्तरावर जाऊन दुसऱ्याची अप्रतिष्ठा केली जात आहे. राजकीय हेतूने बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. गेली ४५ वर्षे मी राजकारणात आहे.
असे आरोप कधीच झाले नाहीत. या वयात मला लक्ष्य केले जात आहे. वृत्त छापून आल्याचा आभास निर्माण करणे, नाव न घेता फोटो वापरणे, हे निंदनीय आहे. कोणी माझे प्रत्यक्ष नाव घेतले नव्हते त्यामुळे मी गप्प राहिलो. तरी लोकांनी मला विचारले. राजकीय हेतूने विरोधकांनी माझ्यावर हवे तेवढे वार करावेत, परंतु एखाद्या महिलेची नाहक बदनामी करु नये. माजी उपसरपंच, महिला अध्यक्ष माझ्यासोबत नाही वावरणार तर दुसरे कोण? काही एनजीओही अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलतात. कमरेखाली वार करतात. दुसऱ्याची बदनामी हेच त्यांचे काम आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
गेली २० वर्षे मी वीज घोटाळा भोगतोय. माझ्यावर पाच खटले घातले. एकच शिल्लक राहिला आहे, तोही माझ्या बाजूनेच निकालात येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. कथित सेक्स स्कॅण्डलच्या बाबतीत माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दामहून कुभांड रचण्यात आले. या प्रकरणात सेक्सही नाही, स्कॅण्डलही आणि किडनॅपिंगही असेही गुदिन्हो म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना भेटणार, मला सखोल चौकशी हवीय
मला मुळापासून चौकशी हवीय. ते वृत्त कोणी तयार केले. कोणाचे संबंध आहेत, हे पोलिसांनी शोधये. ज्याच्याविरुध्द तक्रार र केली आहे, संशय व्यक्त केला त्याला पोलिसांनी चौकशीसाठी आणावे. तक्रार करुन सात दिवस झाले. मी तपासकामाच्या चांगला समाधानी नाही. तपास झाला असे मानायला मी तयार नाही. मुख्यमंत्री उद्या येतील त्यांना भेटून मी चर्चा करीन आणि चौकशीला गती देण्याची मागणी करीन, गोवा लहान असल्याने आरोपीला शोधून काढून कठीण नाही.
क्लिपसाठी धडपड
माझा आवाज क्लोन करुन बोगस ऑडिओ क्लीप तयार करण्याचा प्रयत्न आता चालू आहे. एका टेक्निशियनने हे करण्यास नकार दिल्यावर विरोधकांनी दुसऱ्याला गाठले असून त्याने क्लप तयार करण्याची तयारी दाखवल्याची माहिती मला मिळाली आहे. एका एनजीओने तसेच जबाबदार पोलिस अधिकाऱ्याने याबाबत मला सतर्क केलेले आहे. नजीकच्या काळात अशी ऑडिओ क्लीप आल्यास कोणीही विश्वास ठेवू नये.
फूस लावली....
अनेक फुटीर कॉंग्रेसी आमदार भाजपमध्ये आलेले आहेत. ते पूर्णपणे भाजपवासी कोणी असमाधानी झालेले नाहीत. असणार. आमच्यापैकीच - गोष्टीसाठी फूस असू शकते. बदनामी करुन मंत्रिपद गेले तर जागा रिकामी होईल, हा डाव असू शकतो.