पणजी : गोव्यातून होणारी मासळीची निर्यात आधी बंद करा आणि नंतरच आयातबंदीचा आदेश काढा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निर्यात बंद न केल्यास राज्यात मासळीची भीषण टंचाई निर्माण होईल, अशी भीती पक्षातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी मासळीची आयात बंद करावी, अशी पक्षाचे सुरवातीपासून मागणी होती. परंतु त्याचबरोबर निर्यातीवरही आधी बंदी आणली पाहिजे. आज आयातबंदीचा आदेश काढला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा सरकारकडे आहे का? असा सवाल त्यांनी केला. आमोणकर म्हणाले की,‘खाजगी किं वा मालवाहू वाहनांमधून परराज्यातून मासळी आणली जाऊ शकते. आंतरराज्य बसगाड्या, रेल्वेमधूनही मासळी आणली जात आहे. हे प्रकार बंद करण्यासाठी काय पावले उचलली आहेत हे जनतेसाठी स्पष्ट व्हायला हवे.’
आमोणकर पुढे म्हणाले की, ‘गोव्यात मिळणारी मासळी गोवेकरांनाच मिळाली पाहिजे. या मासळीची निर्यात होता कामा नये. कारण सरकार मच्छिमारांना व्यवसायासाठी सबसिडीच्या स्वरुपात वर्षाकाठी १00 कोटी रुपये देते. गोमंतकीयांना मासळी माफक दरात उपलब्ध व्हायला हवी. जी मासळी गोवेकर खात नाहीत ती मासळी मासळी निर्यात करण्यास हरकत नाही.’
फॉर्मेलिन वादाच्या बाबतीत ते म्हणाले की, ‘ आरोग्यमंत्री विश्वजित राणे, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि मडगांवच्या घाऊक मासळी बाजारातील माफिया इब्राहिम मौलाना या तिघांनी नाटक रचले असून मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असेच चालले आहे. इब्राहिम मौलाना याच्याविरुध्द अजून गुन्हा का नोंदविला नाही याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्र्यांनी द्यायला हवे.’
मच्छिमारीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या सर्व वादात मच्छिमारीमंत्री विनोद पालयेंकर मौन बाळगून आहेत. ते कोणाच्या दबावाखाली येऊन गप्प आहेत, असा सवाल आमोणकर यांनी केला असून खाते चालवायाला जमत नसेल तर पालयेंकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाजुला व्हावे, अशी मागणी केली आहे. मासळीशी संबंधित विषय असतानाही पालयेंकर काहीही बोलायला तयार नाहीत, हे काय दर्शविते, असा सवालही त्यांनी केला.