लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : परिवार पेहचान पत्र (पीपीपी) या हरयाणा सरकारच्या आणि सीएम डॅशबोर्ड या गुजरात सरकारचे उपक्रम गोव्यात लागू करण्याचा गोवा सरकारचा विचार असून या दोन्ही योजनांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थिती लावून परतल्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. गोवा सरकारचे अधिकारी या दोन्ही राज्यांत जाऊन दोन्ही उपक्रमांचा अभ्यास करतील. हे उपक्रम गोव्यासाठी फायदेशीर वाटत असल्यास त्याची अंमलबजावणी गोव्यातही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पीपीपीचा प्राथमिक उद्देश हरयाणातील सर्व कुटुंबांचा प्रामाणिक, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह डेटा तयार करणे आहे. प्रत्येक कुटुंबाला आठ अंकी कुटुंब आयडी प्रदान केला जातो. आयडी त्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्म, मृत्यू विवाहनोंदणी याच्या माहितीशी जोडला जाणार आहे. माहितीचे अपडेटेशनही स्वयंचलित पद्धतीने होत असते.
सीएम डॅशबोर्ड या गुजरातच्या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांना राज्यातील सर्व ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्समधील डेटा मुख्यमंत्र्यांना डॅशबोर्डवर पाहायला मिळतो. जेणेकरून लोकांची कोणती कामे रखडताहेत, कोणती कामे गतीने होत आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळत असते.