लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून योग्य पद्धतीने होणार नाही, अशी कुरबुर काही सत्ताधारी आमदार, मंत्रीच करू लागले होते. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशी तक्रारही केली होती. खुद्द गावडे यांनीच ही गोष्ट उघड केली असून एका अर्थी सत्तेतीलच आपल्या विरोधकांविरुद्ध अत्र उपसले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून स्पर्धा यशस्वी केल्याचा दावा त्यांनी केला.
व्यक्त केली मनातील खदखद मुख्यमंत्र्यांकडे आपल्याविरुद्ध गैरसमज पसरवले जात आहेत, याबाबत मंत्री गावडे यांच्या मनात गेले काही दिवस प्रचंड खदखद होती. . काही सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचे आमदारांनीही कान भरल्याची त्यांची भावना बनली होती. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्यानंतर दिवाळीही झाली आणि गावडे यांनी मौन सोडत एवढ्या दिवसांची मनातील खदखद व्यक्त केली.
अन्य राज्यांकडूनही होता स्पर्धेसाठी विरोध
मंत्री गोविंद गावडे असेही म्हणाले की, गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवणार, असे जाहीर झाल्यावर काही राज्यांनीही गोव्याला शक्य होणार नाही, असा गळा काढला. आता तीच राज्ये यशस्वी आयोजनाबद्दल गोवा सरकारचे कौतुक करीत आहेत.'
गैरसमज पसरविण्याचा झालाय प्रयत्न
मंत्री गावडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात माझ्याविरुद्ध गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न काही जणांनी केले. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनात मुख्यमंत्र्यांचा मला पूर्ण पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला व त्यामुळेच मी या स्पर्धाचे यशस्वीरित्या आयोजन करू शकलो आपल्याविरुद्ध गैरसमज पसरवणारी ही मंडळी कोण? असा प्रश्न केला असता मला कुणाचेही नाव घ्यायचे नाही', असे गावडे म्हणाले.
आपल्यावर केलेली टीका निरर्थक
विरोधी गोवा फॉरवर्ड तसेच इतर पक्षांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनातील त्रुटींवरून मंत्र्यांवर टीका केली होती. समारोप समारंभाला सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनाही पास मिळाले नाहीत. उत्तर गोव्याचे खासदार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक गोवा ऑलिपिक असोसिएशनचे अध्यक्ष असूनही त्यांना केवळ दोन पास देण्यात आले. गोविंद गावडे यांच्या वरील विधानावरून मंत्री तसेच सत्ताधारी आमदारांमध्ये धुसफूस असल्याचे स्पष्ट होते.