पणजी : गोव्यात खाण महामंडळ स्थापण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याची माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली तींत खाणींच्या विषयावर चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री खाण महामंडळ स्थापन करण्यास अनुकूल असल्याची माहिती दिली.
ते म्हणाले की, ‘अनेक विकासकामे केवळ सरकारकडे निधी नसल्याने रखडलेली आहेत. खनिज डंपचा लिलांव केल्यास किमान १५00 कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील आणि या निधीचा वापर विकासकामांसाठी करता येईल. खाणी चालू करण्यासाठी महामंडळ स्थापन करावे, अशी बहुतांश आमदारांची मागणी आहे.
मुख्यमंत्री त्याबद्दल सकारात्मक असून येत्या महिन्यात महामंडळ स्थापण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते. लोबो पुढे म्हणाले की, ‘पर्यटन, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान तसेच अन्य खात्यांना महामंडळे आहेत मग खाण खात्यालाच महामंडळ का नसावे? मुख्यमंत्र्यांनी खाण महामंडळाचे अध्यक्ष व्हावे. कोणत्याही स्थितीत लवकर खाणी सुरु होतील, हे पहावे.’