पणजी : मंत्रिमंडळ विस्तारावरून गोवा प्रदेश भाजपाच्या राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली होती, त्या अस्वस्थतेला तात्पुरता विराम देण्यात सध्या तरी भाजपाचे नेते यशस्वी ठरले आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन कुणाला मंत्रिमंडळात स्थान द्यावे याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे निर्णय घेतील असे उत्तर बहुतेक कार्यकर्ते व आमदारांना देऊन भाजपाने तूर्त हा वाद शमविला आहे.
मंत्रिमंडळातील पांडुरंग मडकईकर व फ्रान्सिस डिसोझा या दोघांना डच्चू देऊन निलेश काब्राल व मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले. डिसोझा व मडकईकर हे आजारी असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केले गेले असे भाजपचे म्हणणे आहे. तथापि, नवे मंत्री झालेले दोन्ही नेते दक्षिण गोव्यातील असल्याने उत्तर गोव्यातील भाजपा आमदार खवळले आहेत. ग्लेन तिकलो, राजेश पाटणेकर या आमदारांनी जाहीरपणे आपली व आपल्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता भाजपाच्या नेत्यांसमोर मांडली.
बार्देश तालुक्यात भाजपाचे तीन आमदार असून तिन्ही आमदार हे ख्रिस्ती धर्मिय आहेत व ते तिघेही अस्वस्थ आहेत. या तिन्ही आमदारांच्या समर्थकांशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर तसेच सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आदींनी संवाद साधला व लोकसभा निवडणुकीपर्यंत कळ सोसा असे त्यांना सांगितले असल्याची माहिती मिळते. म्हापसा मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते तसेच फ्रान्सिस डिसोझा यांचे समर्थक असलेले काही नगरसेवक नाराज झाले आहेत. डिचोलीतही आमदार पाटणेकर यांचे समर्थक असलेले नगरसेवक नाराज झाले. कुंभारजुवे मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी तर प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांच्यावर प्रश्नांच्या फैरीच झाडल्या.
दरम्यान, शनिवारी भाजपाची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. एरव्ही राज्य कार्यकारिणी बैठकीला भाजपाचे सगळे मंत्री, आमदार उपस्थित राहत होते. पण यावेळी बहुतेकांनी पाठ फिरवली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनेक दिवस रूग्णालयात असल्याने व त्यांच्या तोडीचा दुसरा नेता प्रदेश भाजपाकडे नसल्याने तसेच मंत्रिमंडळ विस्तारावेळी अनेकांचा अपेक्षाभंग झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण राहिलेले नाही व त्यामुळे कार्यकारिणी बैठकीलाही जास्त प्रतिसाद लाभला नाही, असे एका माजी मंत्र्याने लोकमतला सांगितले.