लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोव्यात परप्रांतीयांचा अनेक व्यवसायांमध्ये शिरकाव होत असून हा प्रकार चालूच राहिल्यास भविष्यात गोमंतकीय कोणताही धंदा करू शकणार नाही,' अशी चिंता व्यक्त करीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकप्रतिनिधींनी स्थानिकांना उद्योग, व्यवसायात शक्य तेवढे प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या नवीन जागेतील कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी खासदार तथा केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार केदार नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'व्यवसायांमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यासाठी ते धोकादायक आहे. एक दिवस असा येईल की एकही धंद्यात गोमंतकीय शिल्लक राहणार नाही.'
उपस्थित जिल्हा पंचायत सदस्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की, 'केवळ गटारे आणि शेड बांधल्या म्हणजे विकास झाला असे नव्हे, मनुष्याचा विकास करायला शिका. अंगी कौशल्य असलेल्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्या. दुर्बल महिलांना मदत करा. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार तत्पर आहे. अंत्योदय तत्त्वावर समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास व्हायला हवा. राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. लोकप्रतिनिधी या योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा,' असे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रसंगी उत्तर गोवा जिल्हा पंचायत प्रमुख शंकर चोडणकर हेही उपस्थित होते.
जिल्हा पंचायत सदस्यांनी मतदारांची कामे होतील हे कटाक्षाने पहावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर जिल्हा पंचायतीसाठी आता नवीन, प्रशस्त अशी इमारत मिळाल्याने उत्साहही वाढला आहे. या वास्तूचा चांगला उपयोग करा. लवकरच जिल्हा पंचायतीच्या निवडणुका येतील. काहीजणांचे मतदारसंघ राखीव होतील. परंतु काम करणाऱ्यांना नेहमीच पुढेही चांगले दिवस येतात. झेडपी बनल्यानंतर अनेकजण आमदार, मंत्री बनले. पंच, झेडपी, आमदार, खासदार या चार स्तरावर राजकारणात चमक दाखवता येते.
काँग्रेसवर टीका
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की, 'केवळ कायदेशीर निकष पूर्ण करण्यासाठी म्हणून काँग्रेसने जिल्हा पंचायत कार्यालय सुरू केले. एरव्ही हा पक्ष तेवढा गंभीर नाहीच. त्यांना कोणतीही गोष्ट सुरू करण्याची सवय नाही. सरकार जिल्हा पंचायतींच्या निधीबाबत हात आखडता घेणार नाही. मंजूर झालेला सर्व निधी देण्याचे निर्देश वित्त खात्याला दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिक्षा करण्याचीही तयारी
'गरजू लोकांपर्यंत पोहचा, कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे पहा. त्यांना शिष्यवृत्त्या मिळवून द्या, असे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, झेडपींनी लोकांच्या कामांसाठी सरकारी खात्यांच्या संचालकांना अवश्य फोन करावेत व आपली कामे करुन घ्यावीत. एखादा खातेप्रमुख जर असहकार दर्शवत असेल तर त्याला शिक्षा करण्याचीही माझी तयारी आहे.'