लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जनतेची मोठी साथ असल्याने त्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. राज्यातील त्यांचे आदर्शवत काम आणि कार्यक्षमता लक्षात घेता ते लवकरच राष्ट्रीय स्तरावर जाऊन मोठी कामगिरी करतील. साई नर्सिंग संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे उद्गार राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.
साखळी येथील पद्मिनी स्मृती साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, साई नर्सिंगचे उपाध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्षा सिद्धी प्रभू पांडुरंग सावंत, गोपाळ सुर्लकर, संतोष मळीक, प्राचार्य कल्याण सावंत यांच्यासह भाजप नेत्या सुलक्षणा सावंत उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्व. पद्मिनी सावंत यांच्या स्मृतीस राज्यपालांनी पुष्प अर्पण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील पांडुरंग सावंत यांचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच साई नर्सिंगला सहकार्य करणाऱ्या अनेकांचाही गौरव करण्यात आला.
दरम्यान, गेल्या चोवीस वर्षांत अनेकजणांनी मोठी भरारी घेतलेली आहे, त्यांचे खूप सुख समाधान आहे. जे स्वप्न पाहिले त्याची पूर्तता झाली, याचे खूप समाधान असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, पांडुरंग कुर्डीकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गोविंद भगत, तर आभार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मानले.
माझे स्वप्न पूर्ण...
मुख्यमंत्री म्हणाले, आज मनाला खरा आनंद होत आहे. कुशल, समृद्ध समाज हे ध्येय आहे. आई-वडिलांच्या प्रेरणेने राजकीय गुरू पर्रीकर यांच्या सहकार्याने विविध क्षेत्रांसाठी असलेले माझे व्हिजन पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य दिले. त्यामुळेच आज भव्य असे स्वप्न साकारले आहे. डॉक्टरी पूर्ण केल्यानंतर विविध कौशल्य विकसित करून अनेकांना संधी मिळावी यासाठी अनेक अभ्यासक्रम सुरू केले.
कौशल्य विकसित करा
राज्यात फिजिओथेरेपी, नॅचरोथेरेपी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. कौशल्य विकसित केलेल्या विद्यार्थ्यांना देश-विदेशात शंभर टक्के रोजगार उपलब्ध करण्याचा ध्यास आहे. कौशल्य विकसित झाले तरच रोजगार उपलब्ध होतील. युवकांनी सतत मोठे ध्येय ठेवून पुढे जावे. सामाजिक क्षेत्रात काम करताना भविष्य घडू शकते. केवळ नोकरीवर अवलंबून राहू नये, असे आवाहनही सावंत केले.