लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा दौऱ्यावर आलेल्या जम्मू- काश्मीरच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संवाद साधला. नेहरू युवा केंद्राने हा कार्यक्रम कांपाल- पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये आयोजित केला होता.
जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थ्यांचा गट गोव्यात अभ्यास दौऱ्यासाठी आला आहे. काश्मिरी युवा अदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत हे विद्यार्थी आले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी त्यांना गोव्याची संस्कृती, खाद्यपरंपरा तसेच अन्य विविध विषयांवर संवाद साधला. त्या विद्यार्थ्यांनीही आपल्या राज्याची माहिती तसेच विचार उपस्थितांसमोर मांडले.
यामध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना खास काश्मिरी शाल भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या काश्मिरी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ व अन्य उपस्थित होते.