लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.
हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरू करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्राकडून आजपावेतो याबाबतीत मिळालेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. गोव्याची अर्थव्यवस्था खाण व्यवसायावरच अवलंबून असल्याचे सावंत यांनी त्यांच्या निदर्शनास आणले.
आतापर्यंत नऊ खाण ब्लॉकचा लिलांव झालेला असून पैकी वेदांता कंपनीच्या एका खाण ब्लॉकला ईसीही मिळाली आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत लिलाव झालेल्या नऊपैकी तीन ते चार खाण ब्लॉक्स कार्यान्वित होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी याआधीच व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच लिलाव झालेल्या खाण ब्लॉकच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांना काही समस्या आढळून आल्या. या समस्याही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे मांडलेल्या आहेत.
राज्य सरकारतर्फे खाण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, वन विभाग आदी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जलदगतीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश याआधीच दिलेले आहेत. शिरगावच्या खाण ब्लॉकमधून देवी लईराई मंदिर आणि परिसरातील वस्ती वगळण्याचेही निर्देश याआधीच दिलेले आहेत.