लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश प्राप्त झाले व पंतप्रधान मोदींचा करिष्मा अजून कायम आहे, हेही स्पष्ट झाले. गोव्यातील राजकीय समीकरणांवरही निश्चितच प्रभाव पडणार आहे. देशात ताज्या राजकीय वातावरणाची दिशा भाजपलाच अनुकूल असल्याचे नव्याने स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खुर्ची अधिक मजबूत झाली आहे, असे राजकीय विश्लेषकांकडून मानले जाते.
सावंत मंत्रिमंडळात सर्व काही आलबेल नाही, काही मुद्द्यांवर असंतोष आहे हे गेल्या पंधरवड्यात दिसून आलेच. नोकर भरतीचा मुद्दा अधिक गाजला होता. तो मुद्दा दिल्लीपर्यंतही पोहचला. हरयाणा, जम्मू काश्मीर निवडणूक निकालानंतर गोव्यातील काही असंतुष्ट आमदारही मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मंत्रिपद मागतील अशी चर्चा होती. हरयाणामध्ये जर भाजपचा पराभव झाला असता तर काही आमदारांनी डोके वर काढले असते.
सेंट झेवियर व वेलिंगकर वादाचा मुद्दा काही आमदार उचलून समस्या निर्माण करणार होते. पण हरयाणात भाजपने यशाचा विक्रम केल्याने गोव्यातील काही असंतुष्ट आमदारांची हवा गेली. मंत्रीपदासाठी कुणी तगादा लावणार नाही, असे मानले जाते. काही मंत्रीही शस्त्रे बाजूला ठेवतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.