लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को गोवा औद्योगिक विकास : महामंडळाच्या सेवांचे 'डिजिटलायझेशन' केल्यानंतर राज्यातील उद्योग क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी भविष्यात आणखी चांगली सहजता येणार आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या सेवांचे डिजिटलायझेशन केल्यानंतर उद्योग क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया कमी होणार आहेत. त्यामुळे उद्योग करण्यासाठी सहजता येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) वेर्णा औद्योगिक वसाहतीत आयोजित केलेल्या 'आयडीसी कनेक्ट'चे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर उद्योग, व्यापार आणि वाणिज्य मंत्री मावीन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीमल अभिषेक, वेर्णा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष प्रदीप डी'कॉस्ता आणि मान्यवर उपस्थित होते.
सेवा-सहयोग-स्वयंपूर्णच्या थीम खाली आयडीसी कनेक्टची सुरुवात करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानिमित्ताने वेर्णा औद्योगिक वसाहतीत गोवा औद्योगिक महामंडळाने एक दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, त्यात उद्योग क्षेत्राशी संबंधितांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उचित पावले उचलण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्राचा भविष्यात आणखीन उत्तम विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून काम करावे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'डिजिटलायझेशन ऑफ गोवा आयडीसी'ची घोषणा केली. या कार्यक्रमात उद्योग संचालनालय, व्यापार आणि वाणिज्य विभाग, गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, फॅक्ट्रीझ ॲण्ड बॉयलर, इकॉनॉमिक डेव्हलमेंट कार्पोरेशन आणि अन्य विभागांनी सहभाग घेतला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"