लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: दक्षिण कन्नड जिल्ह्यातील भाजपाच्या संकल्प यात्रेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी झाल्याबद्दल सेव्ह गोवा सेव्ह म्हादई मंचाने त्यांचा निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल गोमंतकीय जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गायचे आणि कर्नाटकची बाजू घ्यायची, हे योग्य नव्हे. याबद्दल गोमंतकीय जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकातील प्रचारात जो कोणी सहभागी होईल, मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याला त्याचे परिणाम सेव्ह गोवा सेव्ह म्हादई मंच भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या वेळी प्रशांत नाईक यांनी दिला. हे सारे पूर्वनियोजित आहे. कर्नाटकातील मंत्र्यांनी म्हादईचे पाणी त्या राज्याला मिळणार आणि पाणीप्रश्न सुटणार असे सांगितले. पण मुख्यमंत्री त्या वेळी गप्प राहिले. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या तोंडाला पट्टी लावली, अशी टीका नाईक यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"