पणजी : सरकारमध्ये व सरकारबाहेर सध्या विविध प्रकारचे वाद निर्माण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर दोन महिन्यांनंतर आता मुख्यमंत्री भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारनंतर ही बैठक होईल.
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना व पर्रीकर यांचे आरोग्य ठीक असताना दर आठवडय़ाला एकदा भाजपच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री घेत होते. यावेळी विधानसभा अधिवेशनानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी एकदाही भाजपच्या आमदारांची बैठक घेतली नव्हती. नोकर भरतीच्याविषयावरून मंत्रिमंडळात वाद निर्माण झालेला आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या विषयावरून मंत्री जेनिफर मोन्सेरात व महामंडळाचे चेअरमन असलेले आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्यातील वाद गाजत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या वादात हस्तक्षेपही करून पाहिला. सरकारच्या गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा (सीईओ) विशाल प्रकाश यांनी बुधवारी राजीनामा दिला. सरकारच्या लाल फितीतील कारभाराला प्रकाश यांनी दोष दिला आहे. म्हादई पाणी प्रश्नावरूनही वाद निर्माण होऊ लागला आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने निवाडा दिलेला असतानाही कर्नाटकच्या दबावासमोर येऊन गोवा सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करू पाहत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
या सगळ्य़ा वादांच्या पार्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत भाजपच्या सर्व आमदारांना भेटतील व सरकारी नोकर भरतीची नवी पद्धतही ते आमदारांना समजावून सांगतील, असे सुत्रंनी स्पष्ट केले. भाजपच्या कोअर टीमचे एक-दोन सदस्यही बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रशासनात क वर्गीय भरती यापुढे राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले. तसे त्यांनी पर्सनल खात्याला कळवून नोकर भरतीच्या यापूर्वीच्या काही जाहिराती मागे घेतल्या. यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणो वगैरे संतापले. मंत्री राणो जास्त अस्वस्थ झाले, कारण त्यांच्या आरोग्य खात्याने तेराशे कर्मचा:यांची भरती सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याला चाप लावला. मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक बोलावलेली असली तरी, राणो बैठकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण ते सध्या बेळगावला एका कार्यक्रमासाठी गेलेले आहेत.