लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रामाणिकता महत्त्वाची आहे. मात्र, सहकार संस्थांमध्ये दुर्दैवाने म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन, माशेल महिला अर्बन तसेच अन्य दोन बँका डबघाईत गेल्या. त्यामुळे पैसे गुंतवणाऱ्या सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यासाठी लोकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
मंत्री शिरोडकर पुढे म्हणाले, सहकार संस्था डबघाईस जाता नये, यासाठी सहकार खाते त्यांचे नियमितपणे ऑडिट करणार आहे. तसेच अन्य ठोस पावले उचलतील. संस्थांचा एनपीए वाढू नये यासाठीही ठोस पावले उचलले जातील, असेही शिरोडकर यांनी सांगितले. यावेळी गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई उपस्थित होते.
सहकारी क्षेत्राची उलाढाल १५हजार कोटींपेक्षा अधिक
राज्यात १२० डेअरी सोसायटी, १ हजाराहून अधिक संस्था व २ हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायटी आहेत. गोव्यातील सहकारी क्षेत्राच्या व्यवसायाची उलाढाल १५ हजार कोटींहून अधिक असून यात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
उत्कृष्ट सहकार पुरस्कार आदर्श सोसायटीला
मंत्री शिरोडकर म्हणाले की, सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर पुरस्कार दिला जातो. 'सहकार रत्न' व 'सहकार श्री' या पुरस्काराव्यतिरिक्त उत्कृष्ट सहकार संस्थेचा पुरस्कार केपे येथील आदर्श सोसायटीला मिळाला आहे. उत्कृष्ट सहकार संस्थेसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार तीन संस्थांना जाहीर झाला आहे. यात व्ही. के. सोसायटी, एसीजीएल कर्मचारी सोसायटी व व्हीपीके सोसायटी यांचा समावेश आहे. तर सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या गौरी शिरवईकर व गोविंद नाईक यांना वैयक्तिक गटात पुरस्कार जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिरोड्यात आज पुरस्कार वितरण सोहळा
सहकार सप्ताहानिमित दरवर्षी हे पुरस्कार जाहीर केले जातात. पुरस्कार वितरण सोहळा शिरोडा येथे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होईल.
दत्ताराम देसाई 'सहकार भूषण', प्रतिमा धोंड यांना 'सहकार श्री'
यंदाचा 'सहकार भूषण' पुरस्कार हा सावईवेरे येथील डॉ. दत्ताराम भास्कर देसाई यांना, तर 'सहकार श्री' पुरस्कार महिला सहकार बँकेच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांना जाहीर झाल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
असे आहे पुरस्कारांचे स्वरुप
'सहकार रत्न' पुरस्काराचे स्वरूप १.२५ लाख रुपये व प्रमाणपत्र व 'सहकार श्री' पुरस्काराचे स्वरूप ७५ हजार रुपये व प्रमाणपत्र असे आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांमध्ये सुमारे ५ हजार कर्मचारी काम करतात.
सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आपल्याला 'सहकार श्री' हा पुरस्कार जाहीर झाला. त्यासाठी सरकारचे धन्यवाद. खरे तर हे श्रेय माझ्यासोबत काम करणाऱ्यांचेही आहे. या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात आणखी जास्त काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. सहकारी संस्था या सहकारी स्थानिक पातळीवरील संस्था आहेत. अन्य बँकांच्या तुलनेत लोकांशी यांचा संपर्क जास्त असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये त्याबाबत जागृती व्हावी, यासाठीही आपला प्रयत्न राहील. - प्रतिमा धोंड, अध्यक्ष, महिला सहकारी बँक.