वास्को : खारवीवाडा समुद्रात शुक्रवारी संध्याकाळी एका बार्जची समुद्रात बुडालेल्या ट्रॉलरला धडक बसल्याने बार्जचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही बार्ज पाण्यात बुडली नाही. मात्र, धोका अजून कायम आहे. याप्रकरणी विश्वसनीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सेसा गोवा कंपनीची बार्ज मुरगाव बंदरातून कोळसा घेऊन आमोणा येथे जाण्यास निघाली होती. खारवीवाडा समुद्राच्या मध्यभागी गेल्या कित्येक वर्षांपूर्वी एक पाकिस्तानी ट्रॉलर समुद्राच्या तळाशी बुडालेल्या स्थितीत आहे. या ठिकाणी मुरगाव पोर्ट ट्रस्ट किंवा बंदर कप्तानाने कोणत्याही प्रकारची धोक्याची सूचना निर्देशित केलेली नसल्याने ती बार्ज या बुडालेल्या ट्रॉलरच्या अवशेषांना धडकली. या धडकेने बार्जच्या तळभागाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बार्जमध्ये कोळसा भरलेला असल्याने बार्जच्या तळभागाला एखादे छिद्र पडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे; पण कोळशाने भरलेली असल्याने तत्काळ नुकसान दिसून येत नाही; पण तूर्तास बार्ज बुडण्यापासून वाचली, असे सांगण्यात येते. बार्ज १८०० टन कोळसा घेऊन आमोणा जेटीवर जात होती. ही बार्ज सध्या ट्रॉलरच्या भागावर स्थिरावलेली आहे. बार्ज ट्रॉलरला धडकल्याने बार्जच्या तळभागाचा काही भाग फुटला. त्यामुळे समुद्राचे पाणी बार्जमध्ये शिरू लागले. बार्जवरील कर्मचाऱ्यांनी पंपद्वारे बार्जमध्ये शिरणारे पाणी उपसण्याचे काम सुरू केल्याने बार्ज बुडण्यापासून वाचविण्यात आली. या बार्ज कंपनीचे तांत्रिक अधिकारी एका ट्रान्सशिपरच्या साहाय्याने बार्जमधील कोळसा उपसण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी या कंपनीचे खास तांत्रिक पथक अपघातस्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कोळसावाहू बार्जची बुडालेल्या ट्रॉलरला धडक
By admin | Published: September 12, 2015 2:08 AM