लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी अचानक कळंगुट येथील किनाऱ्याला भेट देत पर्यटन व्यवसायाची झाडाझडती घेतली. यावेळी व्यावसायिकांकडून पर्यटकांची लुबाडणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. पॅरासेलिंगसाठी ८०० ऐवजी ३००० रुपये घेतले जात असल्याचा प्रकारही उघड झाला. काही पर्यटकांनी यावेळी मंत्र्यांकडे तक्रारीही केल्या.
रंगेहाथ पकडलेल्या व्यावसायिकावर कारवाईचे आदेश पर्यटनमंत्र्यांनी दिले. किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रकारांना थारा दिला जाणार नसल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. पर्यटकांना किनाऱ्यावर मोकळेपणाने फिरण्यासाठी सोय व्हावी यासाठी खबरदारी घेण्याची ग्वाही देताना त्यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी दक्षता बाळगण्याची सूचना त्यांनी केली.
मंत्री खंवटे यांनी यावेळी कळंगुट आणि कांदोळी किनाऱ्याची पाहणी केली. कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा, पर्यटन खात्याचे अधिकारी, निरीक्षक दत्तगुरु सावंत आदी उपस्थित होते. राज्यातील इतर किनाऱ्यांची अशाच पद्धतीने पाहणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. पॅरासेलिंग करण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून व्यावसायिक जादा पैसे उकळत असल्याचा प्रकार खंवटे यांच्यासमोर उघड झाला. या व्यावसायिकांनी पर्यटकांकडून ८०० ऐवजी ३,००० रुपये घेतल्याची तक्रार होती.
काही पर्यटकांनी याबाबत मंत्र्यांकडे तक्रार केली. खंवटे यांनी संबंधितांना विचारले असता व्यावसायिक काही खुलासा करू शकले नाहीत. या व्यावसायिकाला व्यवसाय बंद करण्याचे आदेश देऊन खंवटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
अधिकाऱ्यांना खडसावले
किनाऱ्यावर शॅकसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ठरलेल्या जागेतच त्यांची उभारणी केली जावी. रॉक व्यवसायिकांकडून या जागेबाहेर डेक बेड घालण्यात आलेले दिसून आले. या प्रकाराबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. किनाऱ्यावर अतिक्रमणे वाढलेली निदर्शनास आली असून याबाबत कसल्याच प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे खंवटे म्हणाले.
रॉकचा बेकायदेशीर विस्तार
काही व्यवसायिकांनी एका ठिकाणी व्यवसाय थाटला असून त्याचा दुसरीकडे विस्तार केल्याचे उघड झाले. अशा बेकायदेशीर प्रकारांवर योग्य कारवाई केली जाईल, असे खंवटे म्हणाले.
नाईट लाईफ, वाढत्या दलालांमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी पावले उचलण्याची सूचना पोलिसांना केली आहे. किनारी भागात सुसूत्रता आणताना पंचायती, स्थानिक आमदारांच्या सहकार्याने कार्यवाही केली जाईल. - रोहन खंवटे, पर्यटन मंत्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"