सुशांत कुंकळयेकर
मडगाव : गोव्याला नारळाचा पुरवठा करणा:या रायलसीमा व दक्षिण कॅनरा येथे दुष्काळी स्थिती असल्याने गोव्यात नारळाची टंचाई वाढली आहे. सध्या नारळाच्या एका नगाची किंमत 50 रुपयावर पोचली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कृषी खात्याने थेट श्रीलंकेतून नारळाची आयात करण्याचे ठरविले आहे.कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी ही माहिती दिली. मडगावात एका कार्यक्रमाला आले असता गोव्यातील नारळाची टंचाई त्यांच्या लक्षात आणून दिली असता ते म्हणाले, डिसेंबरात राज्यातील नारळाचे दर स्थिर होतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र अजुनही किंमती नियंत्रणात आलेल्या नाहीत त्यासाठीच आम्ही श्रीलंकेहून नारळाची आयात करण्याच्या विचारात आहोत असे ते म्हणाले.गोव्यात नारळाने एवढी उच्चांकी किंमत कधीच गाठली नव्हती. नारळ हा गोव्यातील मुख्य अन्न घटकांपैकी एक असल्याने सामान्यांची होरपळ झाली आहे. यासंबंधी सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, एक आठवडा आम्ही वाट पाहू, जर दर स्थिर झाले नाहीत तर पर्यायी व्यवस्था करु. गोव्यातील उत्पादकांना नारळाची आधारभूत किंमत वाढवून देऊन मोठय़ा बागायतदारांकडून थेट नारळ खरेदी करण्याचीही सरकारची तयारी आहे. हा नारळ सवलतीच्या दरात तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याची आमची तयारी आहे.गोव्यात नारळाचे उत्पादन कमी होते यासाठी डीजे फार्मने विकसित केलेल्या ह्यसंपूर्णह्ण या हायब्रीड नारळाची लागवड वाढविण्याच्या दृष्टीनेही सरकार प्रयत्न करत असून या नारळाची रोपे सवलतीच्या दरात बागायतदारांना उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाचाही आम्ही विचार करु असे ते म्हणाले. गोव्यातील सर्वसाधारण माड तीन महिन्यात 50 नारळ उत्पादित करते त्याच ठिकाणी हे हायब्रीड माडापासून 200 नगांचे उत्पादन घेता येणो शक्य आहे. अशा उत्पादनांतून गोव्याची गरज भागू शकते. गोव्यातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी वेंगुल्र्यातील कोकण कृषी विद्यापीठाकडे हात मिळविणार असेही सरदेसाई यांनी सांगितले.