लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मानसन्मान मिळत नसेल, तर सभापतिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा रमेश तवडकर यांनी दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. महाराष्ट्रात प्रचारासाठी असलेले प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. येत्या १९ रोजी, परतल्यानंतर ते प्रत्यक्ष तवडकरांची भेट घेणार आहेत.
फोंडा येथे रविवारी झालेल्या उटाच्या संमेलनात आपल्याला निमंत्रण दिले नाही, असा दावा करून तवडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सभापतिपदाला किंमत नाही का? असा सवाल करून पदाची शान राखण्यासाठी राजीनामा द्यायलाही मी तयार आहे, असे त्यांनी म्हटले होते.
यानंतर काल तानावडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. 'लोकमत'ने तानावडे यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, मी तवडकर तसेच मुख्यमंत्र्यांकडेही बोललो आहे. १९ रोजी मी तवडकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची कैफियत जाणून घेईन.'