पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोठंबी, डिचोली येथील जमिनीत आपल्याला मुंडकार म्हणून जाहीर करावे यासाठी केलेल्या अर्जाच्या बाबतीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी डिचोली मामलेदारांकडे चौकशी अहवाल मागितला आहे.
मुख्यमंत्री हे स्वत: मुंडकार असल्याचा खोटा दावा करून संबंधित जमीन बळकावू पहात आहेत असा आरोप समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी केला होता. आयरिश यांचे असे म्हणणे आहे की, ‘कोठंबी, डिचोली येथे सर्वे क्रमांक ६0/८ मधील हा भूखंड बळकावण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न चालू आहेत. सावंत यांनी गेल्या २६ सप्टेंबर रोजी डिचोली मामलेदारांकडे आपल्याला या जमिनीत मुंडकार म्हणून जाहीर यासाठी अर्ज केला आणि तीन महिन्यांच्या कालावधीत मामलेदारांनी या अर्जावर तीनवेळा सुनावण्याही घेतल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांचा हा अर्ज खरे तर मामलेदारांनी कायद्याच्या चौकटीत फेटाळायला हवा होता. कारण मुख्यमंत्र्यांनी अर्जात मूळ भाटकाराचे नावही दिलेले नाही तसेच भाटकाराने सावंत यांचे आई-वडील किंवा स्वत: सावंत यांना मुंडकार म्हणून स्वीकारल्याचेही स्पष्ट केलेले नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे.
प्रमोद सावंत यांच्या घराच्या पुनर्बांधणीबाबतही आयरिश यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. १९७0 साली आई वडिलांची मतदारयादीत नावे समाविष्ट असल्याचा दावा सावंत यांनी अर्जात केला आहे परंतु ती याच घरासंबंधी आहे किंवा काय हे स्पष्ट केलेले नाही. घराची वीज जोडणी अजून भाटकाराच्या नावेच आहे आणि आई वडील कायद्याबाबत अनभिज्ञ होते म्हणून त्यांनी ती ह्स्तांतरित करुन घेतली नाही, असे प्रमोद सावंत अर्जात म्हणतात. ही बाब विश्वास ठेवण्यासारखी नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे.