सुशांत कुंकळय़ेकर
मडगाव - दक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनारा असलेला कोलवा आता लवकरच ‘आयकॉनिक’ होणार असून या समुद्र किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी 184 कोटींची योजना केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे. या योजनेखाली कोलवा हा देशातील आदर्श समुद्र किनारा होणार आहे. या किनाऱ्यावरील रुपेरी वाळूमुळे या किनाऱ्याला सिल्वर सँड बीच असे नावही पडले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शुक्रवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील एकूण 17 आयकॉनिक पर्यटन स्थळांची घोषणा केली. त्यात कोलवा बीचचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कोलवा समुद्र किनाऱ्यावरील साधनसामग्रीत वाढ करण्याबरोबरच दर्जात्मक पर्यटन सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत स्थानिक लोककलांनाही उत्तेजन दिले जाणार आहे.
कोलवा समुद्र किनारा हा येथील वाळूसाठी प्रसिद्ध असून एवढय़ा चांगल्या प्रमाणात रुपेरी वाळू गोव्यात अन्य कुठेही सापडत नाही. याशिवाय हा किनारा पोहण्यासाठी इतर किनाऱ्यांच्या तुलनेत सुरक्षित असल्याने मोठय़ा प्रमाणावर पर्यटक आणि स्थानिक या किनाऱ्याला भेट देत असतात.
यासंबंधी बोलताना पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी, कोलवा बीचला आयकॉनिक करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने आपला अहवाल यापूर्वीच केंद्र सरकारला सादर केला असून त्यात समुद्र किनाऱ्यावरील सुविधा वाढविण्याबरोबरच वाहतूक सुविधेत वाढ तसेच चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय जवळपासच्या परिसरात आणखी कुठले पर्यटन पोषक प्रकल्प उभे करता येतील का याचाही विचार केला गेला आहे. या योजनेखाली कोलवा समुद्र किनाऱ्यावर जागतिक दर्जाच्या सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव यांनीही या निर्णयामुळे गोव्यातील पर्यटनाला अधिकच उत्तेजन मिळेल अशी आशा व्यक्त करताना गोवा देशातील नंबर एकच समुद्र किनारा होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोलवा खाडीची सफाई
सध्या मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्यामुळे प्रदुषित झालेली कोलवा समुद्र किनाऱ्याच्या मुखावरील खाडीची सफाई जलसंसाधन खात्याकडून हातात घेतली जाणार असून यासाठी लवकरच सुमारे 12 कोटींची निविदा जारी होणार आहे. सध्या या खाडीत कोलव्यातील हॉटेलांचे सांडपाणी सोडले जाते. या गोष्टीची हरित लवादाने दखल घेत ही खाडी पूर्णपणो साफ करावी आणि प्रदुषण मुक्त करावी असा आदेश दिला होता.