पणजी : कळसा भंडुरा प्रकल्पाला ईसी देणारे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्याकडे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचाही ताबा असल्याचे तसेच काही दिवसात गोव्यात होणाऱ्या इफ्फीच्यावेळी गोमंतकीयांना त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे ध्यानात ठेवावे. शांत गोमंतकीयांच्या उद्रेकास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, गोव्याच्या हिताविरुद्ध कट कारस्थाने करणा-या भाजपच्या केंद्रीय मंत्र्याना गोव्यात प्रवेश बंद करण्यास गोवेकर मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा प्रदेश काँग्रेसने दिला आहे.प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात की, म्हादईच्या विषयावर कर्नाटकाच्या बाजूने झुकते घेत पक्षपातीपणा दाखवणा-या जावडेकरांनी थोड्याच दिवसात इफ्फीच्या निमित्ताने गोवेकरांचा सामना करावा लागेल. गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे रक्षण करण्यास कॉंग्रेस वचनबध्द असून म्हादईला हिरावून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रखर विरोध करण्यास सदैव तत्पर आहोत. चोडणकर म्हणतात की, यापूर्वी गोवा मुक्तीलढा, ५० टक्के बस तिकीट सवलत व इतर विद्यार्थी आंदोलने, राजभाषा आंदोलन तसेच इतर आंदोलनातून गोमंतकीयांच्या एकीचे दर्शन घडले आहे. गोमंतकीयांनी नेहमीच विजयश्रीच मिळवली आहे, याची माहिती मुख्यमंत्री सावंत यानी जावडेकरांना द्यावी.जावडेकरांचे ट्विट खोटे होते काय?, आमदार विजय सरदेसाईंचा खडा सवालकळसा भंडुराला केंद्राने ईसी दिलीच नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी तर मग केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यासंबंधी जी व्टीट केले ते खोटे होते काय? असा सवाल केला आहे. जावडेकरांनी ईसीसंबंधी केलेले ट्विट आणि त्यानंतर मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उत्तरादाखल मानलेले धन्यवाद हे सर्व खोटे होते, असे मुख्यमंत्र्यांना म्हणायचे आहे का, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांनी व्टीेटरवर जावडेकरांच्या व्टीटचा स्क्रीनशॉटही टाकला आहे. जावडेकर यांनी स्वत:चे ट्विट नंतर काढून टाकले होते.
इफ्फीत गोमंतकीयांना सामोरे जावे लागणार हे जावडेकरांनी ध्यानात ठेवावे; काँग्रेसचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 9:38 PM