- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: आंतरराष्ट्रीय विमानसेवा अजून सुरू न झाल्याने विदेशी पर्यटक अजून गोव्यात आलेला नाही त्यामुळे ही पोकळी आता देशी पर्यटकांकडून भरून काढण्याचे आदरातिथ्य व्यावसायिकांनी ठरविले असून सद्या गोव्यात 5 स्टार हॉटेलची रम अवघ्या 4 ते साडे चार हजारात मिळू लागली आहे. तर 3 स्टार हॉटेल्सनी आपले रम भाडे अवघ्या दीड हजारावर आणले आहे.यामुळे गोव्यात विकेंडला येणाऱ्या देशी पर्यटकांचे प्रमाण वाढू लागले आहे. दक्षिण गोव्यात हे प्रमाण थोडे कमी असले तरी उत्तर गोव्यात शनिवार रविवार असे दोन दिवस हॉटेल्स भरू लागली आहेत.
वास्तविक गोव्यातील हॉटेल व्यवसाय विदेशी पर्यटकावरच चालतो. पण तेच नसल्याने आता देशी पर्यटक कसे येतील यावर व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित केले असून त्यामुळेच गोव्यातील रूम रेट्स कधी नव्हे एवढे यावेळी खाली आले आहेत.गोव्यातील मध्यम आणि लहान हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष सेराफीन कॉता यांनी दिलेल्या माहितीनुसार तारांकित हॉटेल्सनी आपले दर कमी केल्याने अशा हॉटेल्समध्ये पर्यटक वाढले आहेत मात्र त्यामुळे लहान हॉटेल चालकांचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे.सध्या गोव्यात येणारा देशी पर्यटक आपल्या स्वतःच्या गाडीने येणेच जास्त पसंत करू लागले आहेत हीही बाब पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे शनिवार रविवारी परराज्यात नोंदणीकृत झालेली वाहने कोलवा बाणावली भागातील रस्त्यावर दिसू लागली आहेत.
गोव्यात देशी पर्यटक येऊ लागला आहे ही गोष्ट खरी असल्याची माहिती शेकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्डोज यांनी दिली. सध्या समुद्र किनाऱ्यावरील शेक्समध्ये गर्दी वाढू लागली आहे असे त्यांनी सांगितले. विशेषतः ज्या किनाऱ्यावर स्टार हॉटेल्स आहेत त्यभागातील शेक्समध्ये ही गर्दी जास्त असते. तारांकित हॉटेल्समध्ये राहणारे बहुतेक पर्यटक खान पानासाठी या शेक्समध्ये येणेच पसंत करतात अशी माहिती अन्य एका शेक मालकाने दिली.
गोव्यात देशी पर्यटक वाढल्याने इतर व्यवसायिकही खुश आहेत. विशेषतः जलक्रीडा चालक अधिक खुश आहेत. या महामारीच्या काळात आम्ही धंदा करू शकतील अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती मात्र मागच्या काही दिवसात पर्यटकांची जी संख्या वाढली आहे ती पाहता आम्हाला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळू लागला असल्याची माहिती बाणावली येथील जलक्रीडा चालक पेले फेर्नांडिस यांनी दिली.
बहुतेक पर्यटक ' गेटेड'-
गोव्यात जरी देशी पर्यटक यायचे प्रमाण वाढू लागले असले तरी निम्म्याहून अधिक पर्यटक 'गेटेड' (खासगी घरे भाड्याने घेऊन राहणारे) असल्याने अधिकृत हॉटेल चालकांना त्यांचा काहीच फायदा नसल्याची माहिती हॉटेल चालक संघटनेचे अध्यक्ष शेराफीन कॉता यांनी दिली. हे पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येतात. ज्या घरात ते राहतात तिथेच ते स्वयंपाक करतात त्यामुळे टॅक्सी चालक आणि रेस्टॉरंट यांनाही त्यांचा फायदा नाही. फायदा जर कुणाला होत असेल तर तो किनारपट्टी भागातील सुपर स्टोअर्सना असे कॉता म्हणाले.
महाराष्ट्रातील निर्बंधांचा परिणाम शक्य-
मागच्या काही दिवसात गोव्यात देशी पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले असले तरी महाराष्ट्र सरकारने जो नवीन एसओपी राज्यात लागू केला आहे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होण्याची शक्यता क्रूझ कार्डोज यांनी व्यक्त केली. नवीन एसओपी लागू केल्यावर गोव्यातील बरेच पर्यटक माघारी परतले अशी माहिती त्यांनी दिली. नवीन एसओपी लागू झाल्यानंतर मुंबईहुन रेल्वेने गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही काही प्रमाणात कमी झाल्याची माहिती कोरेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.