लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: ग्रीन शाळा ही संकल्पना सुरू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. ग्रीन शाळा पाहण्यासाठी तुम्ही गोव्यात या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात केले.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आर्थिक, प्रशासन, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात गोवा हे स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकत आहेत. ग्रीन सरकारी प्राथमिक शाळा ही संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे गोवा हे पहिले राज्य. ही शाळा कशी आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्रवासीयांनी गोव्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, की शिवाजी विद्यापीठाशी आपले खास नाते आहे. या विद्यापीठातून आपण पदवीचे शिक्षण घेतले आहे. आत्मनिर्भर भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून ती शेतकऱ्यांपासून ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गोव्यात सुद्धा आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोव्याच्या धर्तीवर विकास केला जात आहे. सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांपर्यंत पोचत आहे. यात दिव्यांग व्यक्तींपासून ते समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने १२१ योजना ऑनलाईन केल्या आहेत. लोक घरबसल्या त्यासाठी अर्ज करू शकतात. राज्यात शाश्वत विकासावर भर दिला जात आहे. याशिवाय रोजगार वृद्धीवरही विशेष भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील हे डबल इंजिन सरकार यशस्वीपणे काम करीत आहे. गोवा लहान राज्य असले तरी विकास व प्रगतीबाबत त्याची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के व अन्य मान्यवर उपस्थित होते.