लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : ओबीसींमध्ये एकोणीस विविध जातींचे, समाजाचे लोक आहेत. त्यांनी आता एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आज विविध क्षेत्रांत त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला हव्या. राज्यातील ओबीसी महासंघाचे कार्य अध्यक्ष मधू नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्टपणे चालू ठेवले हे कौतुकास्पद आहे,' असे उद्गार जलस्रोत आणि सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.
ओबीसींचे नेते बिंदेश्वरीप्रसाद मंडल यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पर्वरित आयोजित केलेल्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक, अनुसूचित जाती-जमाती आयुक्त अॅड. दीपक करमलकर, प्रभाकर ढगे, पद्मनाभ आमोणकर, सरचिटणीस सर्वेश बांदोडकर आदी उपस्थित होते. मंत्री शिरोडकर म्हणाले की, तत्कालीन बिहारचे मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी पुढाकार घेऊन ओबीसींसाठी प्रयत्न करून मान्यता मिळविली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण जमलो आहोत. यापुढे राज्यातील बाराही तालुक्यात त्यांची जयंती साजरी करण्याचा निश्चय आपण करू. बहुजन आवाज या ई-पेपर आणि वेबसाईटचे लाँचिंग ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे ओबीसीतील सर्व समाजबांधव एकत्र येतील, अशी खात्री वाटते.
प्रभाकर ढगे यांनी बिंदेश्वरी प्रसाद यांच्या कार्याचा घेतला. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा ओबीसी आयोग नेमण्यात आला होता. ओबीसी आयोगाचे खरे शिल्पकार त्यांना म्हटले. बाबासाहेब आंबेडकर यांनी एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पाहिले ते बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी पूर्ण केले, असे ते म्हणाले. आमदार पेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला घालण्यात आली. प्रदीप धुळापकर यांनी स्वागत केले. पराग वेळुस्कर यांनी प्रास्ताविक केले. महिलांनी स्वागत गीत, फुगडी आणि धालो कार्यक्रम सादर केले. समाजातील लोकांना उपलब्ध सरकारी योजनांची माहिती दिली.