पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: साकवाळ कोम्युनिदाद जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या बांधलेल्या ६४ घरांवर बुधवारी (दि.२९) सकाळी कारवाई करून ती घरे जमिनदोस्त करण्यास सुरवात केली. संध्याकाळपर्यंत होणाऱ्या कारवाईत सुमारे ४० घरे जमीनदोस्त होण्याची शक्यता साकवाळ कोम्युनिदादचे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर यांनी व्यक्त करून राहिलेली घरे गुरूवारी जमीनदोस्त केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी कडक पोलीस सुरक्षा बंदोबस्तात साकवाळ कोम्युनिदादने त्यांच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेली ६४ बेकायदेशीर घरे जमिनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरवात केली. साकवाळ कोम्युनिदादचे अध्यक्ष प्रताप म्हर्दोळकर, अर्टनी जयेश फडते आणि खजिनदार श्रीनिवास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घरे जमिनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरवात झाली. घरे जमिनदोस्त करण्याच्या कारवाईबाबत अधिक माहीतीसाठी साकवाळ कोम्युनिदाद चे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर यांना संपर्क केला असता दोन वर्षापासून येथे बांधलेल्या बेकायदेशीर घरांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पावले उचलत असल्याचे सांगितले. बिर्ला पोलीस आऊट पोस्टच्या मागे असलेल्या त्याजागेत त्यावेळी फक्त २ ते ३ बेकायदेशीर घरे होती. आम्ही त्या लोकांना तेथे अतिक्रमण करून बेकायदेशीर घरे बांधू नकात अशी अनेकवेळा विनंती केली. मात्र त्या लोकांनी एक न ऐकता दोन वर्षात तेथे ६४ बेकायदेशीर घरे उभी केल्याचे म्हार्दोळकर म्हणाले.
कोम्युनिदाद प्रशासकाच्या आदेशाविरुद्ध आम्ही न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्या घरांवर कारवाई करण्याचा निर्देश कोम्युनिदाद प्रशासकाला दिली. त्यानुसार कोम्युनिदाद प्रशासकाने आम्हाला साकवाळ कोम्युनिदाद जागेत असलेल्या ३२ बेकायदेशीर घरांवर कारवाई करण्याचा आदेश दिली. त्यानुसार आज कारवाईला सुरवात केली असता ३२ बेकायदेशीर घरांबरोबरच अन्य ३२ अज्ञात बेकायदेशीर घरे तेथे उभी असल्याचे दिसून आल्याचे म्हार्दोळकर यांनी सांगितले. साकवाळ कोम्युनिदाद कडून सुरू केलेल्या कारवाईत सर्व ६४ बेकायदेशीर घरे जमिनदोस्त करण्यात येईल अशी माहीती त्यांनी दिली. बेकायदेशीर रित्या बांधलेल्या त्या ६४ घरांपेकी सुमारे ३ घरे पक्की बांधकामे असून राहीलेली इतर घरे पत्र्याची आहेत.
साकवाळ कोम्युनिदादचे अर्टनी जयेश फडते यांना संपर्क केला असता दोन वर्षापासून लोकांना अनेकवेळा सांगून सुद्धा त्यांनी एक न ऐकता येथे ६४ बेकायदेशीर घरे बांधली. साकवाळ कोम्युनिदाद जागेत बेकायदेशीर घरे बांधण्यात येत असल्याची माहीती काही काळापूर्वी मिळाल्यानंतर तेथे आम्ही पाहणीसाठी गेलो असता बांधकाम करणारे लोक आम्हाला मारण्यासाठी आले. त्यानंतर आम्ही तेथे पोलीस सुरक्षा घेऊन पाहणी केल्याची माहीती जयेश फडते यांनी दिली. शेवटी त्या घरांवर कारवाई करण्याचा आदेश आल्यानंतर आज ती घरे साकवाळ कोम्युनिदादने जमिनदोस्त करण्यास सुरवात केल्याची माहीती अर्टनी जयेश फडते यांनी दिली.