लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्मचारी निवड आयोगाकडून रविवारी लायब्ररीयन, चित्रकला शिक्षक व अन्य पदांसाठी घेतलेल्या 'सीबीटी' परीक्षांचे निकाल अवघ्या २४ तासातच जाहीर झाले आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल अपलोड करण्यात आला असून प्रत्येक उमेदवाराला वैयक्तिकपणेही कळवण्यातही आले आहे.
फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच आसगाव येथील फादर आग्नेल इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी दिवसभरात चार सत्रांमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. संगणकाधारित सीबीटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करणे सोपे झाले.
आयोगाचे सदस्य दौलतराव हवालदार यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, अशा प्रकारे झटपट निकाल जाहीर करण्याची घटना भरती परीक्षेच्या बाबतीत प्रथमच घडली आहे. १२७३ उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केले होते. पैकी ९८४ जणांनी सीबीटी परीक्षा दिली. रविवारी परीक्षेनंतर लगेच आम्ही उमेदवारांना किती गुण मिळाले हे कळवले व सोमवारी संकेतस्थळावर सविस्तर अपलोडही केले. अशा प्रकारे जलदगतीने निकाल दिल्यास उमेदवारांची आयोगाप्रती विश्वासार्हताही वाढेल. यापुढेही अशाच प्रकारे लगेच निकाल जाहीर केले जातील. वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये रिक्त जागांसाठी यापुढे जाहिराती येतच राहतील, असे त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक कामगिरी
राज्य सरकारने आयोग स्थापन केल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आली होती. अवघ्या २४ तासांत परीक्षेचा निकाल जाहीर करून आयोगाने इतिहासच रचला आहे. सरकारी खात्यांमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल एवढ्या कमी कालावधीत जाहीर करणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य असावे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
या खात्यांसाठी झाली होती सीबीटी
काल निकाल जाहीर झाले त्यात उच्च शिक्षण खात्यासाठी लायब्ररीयन ग्रेड- वन आणि ग्रेड-टू अशा १६ पदे, माध्यमिक विद्यालयामध्ये ७ चित्रकला शिक्षक, पोलिस दलात सहाय्यक उपनिरीक्षक व लॅब टॅक्निशियन, म्युझियम खात्यात सहाय्यक कंझर्वेटर, बंदर कप्तान खात्यात लाइट हाऊस कीपर या पदांचा समावेश आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही पदांसाठी शक्य तेवढी प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.