लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : आजकाल घरातून संवाद कमी होत चालला आहे. आता घरात फक्त मोबाईलद्वारे मेसेज टाकून संवाद - साधून गप्प बसून एकमेकांना बघत राहणे एवढेच चालू आहे. त्यामुळे जनसंपर्क तुटत चालला आहे, असे प्रतिपादन भारतीय मनोरंजन उद्योग आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रशांत दामले यांनी केले.
वास्कोतील रवींद्र भवन बायणाच्या मनोहर पर्रीकर सभागृहात ४७ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारतीय जनसंपर्क मंडळाच्या गोवा शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर भारतीय जनसंपर्क मंडळाच्या गोवा शाखेचे अध्यक्ष दीपक नार्वेकर, सचिव निखिल वाघ, ज्येष्ठ पत्रकार तसेच गोवा शाखेचे उपाध्यक्ष वामन प्रभू तसेच वास्को रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, गोव्यातील निवृत्त माहिती संचालक गुरूनाथ पै उपस्थित होते. गोवा शाखेचे सदस्य व कार्यकारी समितीचे सदस्य निकिता चोडणकर, जॉन्स सॅम्युअल व इतर मान्यवर उपस्थित होते.
दामले पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहिले तर तोंडी संवाद लुप्त होत चालले आहे. आपण किती बोलतो, कसं बोलतो यावरच आपला 'पीआर' अवलंबून आहे. जनसंपर्क हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. तेव्हा एकमेकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच आपला जनसंपर्क वाढण्यास मदत होईल.
मंडळाच्या गोवा शाखेतर्फे यावेळी प्रशांत दामले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव व संघटनेचे पदाधिकारी दीपक नार्वेकर, निखिल वाघ यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी दामले यांच्या हस्ते संघटनेच्या समाज माध्यमाचे अनावरण करण्यात आले. निखिल वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्नेहल संझगिरी यांनी केले.