लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणे तालुक्याच्या विकासासाठी आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. मोपा विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सुटसुटीत कायदा करण्याचा आपला प्रयत्न असणार, तसेच कुळ, मुडकारांनाही न्याय देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
पेडणेतील काही पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. मुख्यमंत्री सावंत यांची मंत्रालयात दि. २९ रोजी काही पत्रकारांनी भेट घेतली. त्यामध्ये निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, मकबूल माळगीमणी, हसापूर चांदेल सरपंच तुळशीदास गावस आदी उपस्थित होते.
मोरजी पंचायतीने बालभवन केंद्र उभारण्यासंदर्भात वेळोवेळी ठराव मंजूर केला, त्या बालभवन केंद्राचे काय झाले, असा सवाल निवृत्ती शिरोडकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांना केला असता, आपण जातीने यात लक्ष घालून हे केंद्र उभारू, असे आश्वासन दिले.
कुळ मुंडकार नागरिकांना न्याय देणार
मागच्या साठ वर्षांपासून कुळ, मुंडकार म्हणून शेतकयांचे खटले प्रलंबित आहेत. त्यांना जमिनीचा हक्क, त्यांच्या घरांचा हक्क मिळून द्यावा, अशी मागणी केली असता मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ मुडकारांना न्याय मिळावा म्हणून कायदा तयार केला. या सर्वांचा विचार करत आपणही भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. त्यासाठी कुळ, मुंडकारांनी आमदारांच्या संपर्कात राहावे, अशी सूचना केली. दरम्यान, पेडणे तालुका नागरिक समिती कुळ मुंडकारसंदर्भातजनजागृती करीत आहे, असे पत्रकारांनी लक्षात आणून दिले. त्या सर्वांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर केली.
चर्चेद्वारे समस्या सोडवूया : मुख्यमंत्री
पेडणे तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या आपण सोडवणार. आपण ज्यावेळी पेडणे तालुक्यात सार्वजनिक कार्यक्रमाला येणार, त्यावेळी पेडणे तालुक्यातील पत्रकारांना खास वेळ देऊन त्यांच्याशी हितगूज करणार. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
ग्रामीण पत्रकारांच्या समस्या सोडवणार
राज्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांना तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सरकारी जागेमध्ये पत्रकार कक्ष उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी त्या त्या तालुक्यातील पत्रकारांना शहरामध्ये सरकारची एखादी इमारत किंवा एखादी खाली जागा मोकळी असेल त्या इमारतीमध्ये कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. राज्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांनी एकत्र येऊन सरकारदरबारी नोंदणी करावी. त्यानंतर आपल्याकडे यावे. माहिती आणि प्रसिद्ध खात्याचे संचालक व पत्रकारांचे शिष्टमंडळ यांच्यासमवेत संयुक्त चर्चा घडवून आणली जाईल. तसेच, वेळप्रसंगी गूज संघटनेशीही चर्चा करून ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाहतूक पोलिस पर्यटकांना सतावणार नाही
राज्यात आणि पर्यायाने किनारी भागातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिस पर्यटकांना सतावण्याचे प्रयत्न करतात, असे मुख्यमंत्री सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यापुढे असे प्रकार घडणार नाही, तशा प्रकारची सूचना ट्राफिक पोलिस अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना न्याय देणार
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळालेला नाही. त्यांना लवकरात लवकर मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी केली असता मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या सर्वांना योग्य तो न्याय आणि मोबदला मिळवून देणार आहे. तसेच, ज्यांचे पैसे अजून सरकारी तिजोरीमध्ये आहेत, त्यांना ते मिळावेत त्यासाठी सुटसुटीत कायदा करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनीव्यक्त केला.