लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीः आयपीबी विधेयक येत्या महिन्यात गोवा मंत्रिमंडळाची फेररचना केली जाण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे येत्या आठवड्यात दिल्ली भेटीवर जाण्याची शक्यता आहे. दोन आमदार आपल्याला मंत्रीपद मिळविण्यासाठी खूप धडपडू लागले आहेत. मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांचा एक छोटा गट सध्या असंतुष्ट असून येत्या २३ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे भाजप कार्यालयाच्या भूमीपूजनानिमित्त गोव्यात येतील तेव्हा हा गट त्यांना स्वतंत्रपणे भेटणार आहे अशी माहिती मिळाली.
विधानसभा अधिवेशनात यावेळी विविध आघाडांवर घोसरकारचे विविध आरोप झाले. सरकारने गेल्या तीन वर्षांत प्रचंड उधळपट्टी केलीय हेही विधानसभेतील चर्चेमुळे व बाहेर आलेल्या माहितीमुळे लोकांना कळाले आहे. लोकांत नाराजी आहे.
सभापती रमेश तवडकर यांना मंत्रीपद दिले जाईल काय अशी विचारणा गेले दोन दिवस अनेक लोक करत आहेत. तवडकर यांनी स्वतः मंत्रीपद मागितलेले नाही असे काहीजण सांगतात. मात्र नीलेश काब्राल यांना पुन्हा मंत्रीपद हवे आहे. आमदार गणेश गावकर यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी पूर्वीच सावर्डे मतदारसंघातील अनेक सरपंचांनी केली आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मंत्रीपद देण्याची ग्वाही पूर्वी दिली गेली होती पण त्यांना अजून पद मिळालेले नाही. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचेही नाव चर्चेत आहे. येत्या २३ रोजी कदाचित चित्र स्पष्ट होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.
४० लाखांचे लाडू कुणी खाल्ले?
अधिवेशनात विजय सरदेसाई, युरी आलेमाव, वेंझी व्हीएगश, एल्टन डिकॉस्टा यांनी सरकारी खात्यांना व काही मंत्र्यांना एक्सपोज केले आहे. त्याचवेळी ४० लाखांचे लाडू सरकारने विकत घेतले. सरदेसाई यांनी अधिवेशनात ही गोष्ट दाखवून दिली. भाजपच्या केंद्रीय नेत्यांपर्यंत ही माहिती पोहचली आहे. मध्यंतरी झालेल्या मंत्र्यांच्या जनता दरबार, सरकार तुमच्या दारी कार्यक्रमावेळी हे लाडू वाटल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात लाडू कमी वाटले व बिल ४० लाखांचे झाले अशी चर्चा विरोधी आमदारांमध्ये सुरू आहे.
मंत्र्यांचा परफॉर्मन्स बिकट
मंत्रिमंडळात बदल करून काहीजणांना डच्चू द्यावा लागेल व दोघा तरी आमदारांना मंत्रीपदे द्यावी लागतील याची कल्पना भाजपच्या केंद्रीय नेत्यांना काहीजणांनी दिली आहे. ही मंत्र्यांचा विधानसभेतील परफॉरमन्स हा खूपच कमी दर्जाचा होता, काही मंत्री होमवर्क करून येतच नाहीत हेही स्पष्ट झाले. काही मंत्र्यांमुळे सरकार विधानसभेत एक्सपोज झाले ही जनभावना आहे.
पाच मंत्री, आमदार दिल्लीत दाखल
दरम्यान, मंत्री रोहन खंवटे, मंत्री सुभाष फळदेसाई व मंत्री आलेक्स सिक्चेरा गुरुवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आश्चर्य म्हणजे मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर हेही दिल्लीत आहेत. आमदार कार्ल्स फरेराही दिल्लीत दाखल झाले. जीत आणि मंत्री फळदेसाई यांनी दिल्लीत खासदार सदानंद तानावडे यांची भेट घेतली.
गावांत जावे लागेल : लोबो
आमदार मायकल लोबो यांनी लोकमतशी बोलताना गुरुवारी सांगितले की, लोकांच्या समस्या खूप आहेत हे यावेळी अधिवेशनात कळून आले. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना व आमदारांना प्रत्यक्ष गावांमध्ये जावे लागेल, केवळ प्रशासन तुमच्या दारीचा सोपस्कार नको. प्रत्यक्ष गावात जाऊन लोकांची गाऱ्हाणी मंत्र्यांनी ऐकावी व प्रश्न सोडवावेत, असे लोबो म्हणाले. मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी मी बोलत नाही, मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले, लोक सरकारकडे पाहत आहेत असेही ते म्हणाले.