पणजी : तिस-या मांडवी पुलाचे ७0 टक्के काम झाल्याचा तसेच हा पूल येत्या आॅगस्टमध्ये पूर्ण होणार असल्याचा दावा साधन सुविधा विकास महामंडळाच्या अधिका-यांकडून करण्यात येत आहे. जोड उड्डाण पुलासह एकूण ४४३४ मिटर लांबीचा आणि २१ मिटर रुंदीचा हा चौपदरी पूल असेल. नदीवर प्रत्यक्ष ६00 मिटरचा पूल हा केबल स्टेड असेल. देशातील हा सर्वात लांबीचा केबल स्टेड पूल ठरणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील आघाडीची मेसर्स लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनी या पुलाचे काम करीत आहे. तर मेसर्स एस. एन. भोबे अॅण्ड असोसिएटस ही सल्लागार कंपनी आहे. साधन सुविधा विकास महामंडळाच्या देखरेखीखाली हे काम सुरु आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, हा महत्त्वाकांक्षी पूल महामंडळासाठी फ्लॅगशिप प्रकल्प ठरेल. गंज चढू नये यासाठी विशिष्ट प्रकारचे सीआरएस पोलाद बांधकामासाठी वापरण्यात आले आहे. मूळ पुलासाठी एम ६0 हे विशिष्ट काँक्रिट तर जोड उड्डाणपुलासाठी एम५0 हे विशिष्ट काँक्रिट वापरले जात आहे. चालू महिनाअखेरपर्यंत चारही खांब जोडले जातील, असे त्यांनी सांगितले. मध्यंतरी हरित लवादाकडे प्रकरण गेल्याने काम रखडले त्यामुळे २२ कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहितीही त्यांनी दिली. कुंकळ्येंकर म्हणाले की, पुलाचे काम आॅगस्टपर्यंत पूर्ण होणार असले तरी पावसामुळे हॉटमिक्स डांबरीकरण शक्य होणार नाही त्यामुळे थोडा विलंब लागू शकतो. हॉटमिक्सिंगसाठी पर्यायी तंत्रज्ञानाबाबतही विचार चालू आहे.
महामंडळाचे अधिकारी संदीप चोडणकर यांनी सांगितले की, या केबल स्टेड पुलाच्या उत्तरेकडील भागात दोन स्पॅन जोडण्यासाठी अवघे काही फुटांचे अंतर बाकी आहे. त्यामुळे पुढील एक दोन दिवसात हा भाग पूर्ण होईल. उड्डाणपुलाचे तसेच जोडरस्त्यांचे कामही वेगात चालू आहे. आॅगस्टपर्यंत हा पूल पूर्ण होऊ शकतो. पुंडलिकनगर जंक्शन ते मेरशी जंक्शनपर्यंत या पुलाचे बांधकाम चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ वर मांडवी नदीवर येणारा हा पूल रहदारी सुरळीत करण्यासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
जलवाहतुकीसाठी १५0 मिटरचे अंतर ठेवण्यात आले आहे.उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांना जोडणारे आणखी दोन पूल येथील मांडवी नदीवर आहेत परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ते अपुरे पडू लागले आहेत. तिसºया मांडवी पुलामुळे उत्तरेकडून येणाºया वाहनधारकांना राजधानी शहरात न येता थेट फोंडा, मडगांव, वास्कोला जात येईल. या पुलाचा अंदाजित खर्च ८२२ कोटी रुपये आहे. यातील ४६२ कोटी ६0 लाख रुपये कर्ज स्वरुपात मिळणार आहेत.