पणजी : विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला गोव्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड झाली. औद्योगिक आस्थापने तसेचे काही ठिकाणी टॅक्सीही बंद राहिल्या. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा नेहमीप्रमाणे चालू होत्या. दिवसभरात कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नसून बंद शांततेत पार पडला. कामगार संघटनांनी हा बंद यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
खाजगी बसगाड्या दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. राजधानीतील बस स्थानकावर सकाळी एक दोन खाजगी बसेस आल्या. परंतु नंतर त्या बंद ठेवण्यात आल्या. चोडण आणि दिवाडी येथील फेरीबोटी सकाळी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. विद्यार्थ्यांना शाळेत पोचता आले नाही.
कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणल्या होत्या परंतु त्या अपुºया पडल्या. लोकांना कदंब बसगाड्यांची तासन्तास वाट पहावी लागत होती. रिक्षा, मोटरसायकल पायलटांनी व्यवसाय चालू ठेवला त्यामुळे त्यांची बरीच कमाई झाली. ‘गोवा माइल्स’अॅपच्या माध्यातून टॅक्सी सेवाही चालू होती.
बाजारपेठा चालू होत्या परंतु लोकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने दुकानांमध्ये ग्राहक नव्हते. डिचोलीत बुधवारी आठवड्याच्या बाजारावरही परिणाम झाला. बस स्थानकांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‘एस्मा’ धुडकावून फेरीबोट कर्मचाºयांनी बंदमध्ये भाग घेतला. सकाळी चोडण तसेच दिवाडी येथील फेरीबोटी बंद होत्या. नंतर त्या सुरु करण्यात आल्या.
बंद यशस्वी झाल्याचा दावा
सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्तरावर दहा कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. या अनुषंगाने ‘गोवा कन्वेंशन आॅफ वर्कर्स’च्या झेंड्याखाली कामगारांनी बंद पुकारला होता. आयटकचे सचिव अॅड. सुहास नाईक यांनी सायंकाळी या प्रतिनिधीशी बोलताना बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. सरकारच्या धोरणाविरुध्द सर्वसामान्य जनतेची चीड दिसून आल्याचे ते म्हणाले. लोकांनी आपणहून उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतल्याचा दावा त्यांनी केला.