पणजी: काेमुनिदादच्या जमिनी गोमंतकीयांनाच द्यावी, गोमंतकीयांवर जमिनींबाब अन्याय करु नये अशी मागणी करुन रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजी)उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांना निवेदन सादर केले.
गोमंतकीयांना पुढे करुन हे सरकार कोमुनिदाद जागेत परप्रांतीयांना बांधलेली बेकायदेशीर घरे कायदेशीर करु पहात आहे. सरकारने या विषयाचे राजकारण केले आहे. कोमुनिदादच्या जमिनींची या गोमंतकीयांसाठी राखून ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणीही आरजीने केली.
आरजी नेता मनोज परब म्हणाले, की उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक सागर गावडे यांना पक्षाने मागणीचे निवेदन सादर केले असून त्यांनी या विषयी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. कोमुनिदाद जमिनीं या आमच्या पूर्वजांनी शेती, मैदाने तसेच ज्यांकडे घरे नाहीत, त्यांना घरे बांधता यावी यांच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. मात्र आज या जमिनींवर परप्रांतीयांकडून अतिक्रमण करुन त्यावर बेकायदेशीर घरे व अन्य बांधकामे केली आहे. सरकार तसेच सरकारी यंत्रणा या बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला.