पणजी : गोव्यात विविध प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण वाढले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने राज्यात चाळीशीतील तरुणही मृत्यू पावत आहेत, अशा शब्दांत विरोधी काँग्रेस आमदारांनी सोमवारी विधानसभेत चिंता व्यक्त केली. सरकारने फॉर्मेलिन माशांचा विषय गंभीरपणो घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांसह राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव व भाजपचे आमदार मायकल लोबो यांनीही केली.
फॉर्मेलिन माशांच्या विषयावरून गोमंतकीयांमध्ये भिती व चिंता असल्याविषयी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व निलेश काब्राल यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. त्या सूचनेच्या अनुषंगाने चर्चा करताना काँग्रेसचे आमदार इजिदोर फर्नाडिस म्हणाले, की आपण स्वत: केएलई इस्पितळात एक चाचणी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तिथे मी डॉक्टरांशी बोललो तेव्हा अनेक गोमंतकीय कॅन्सरविषयक चाचणी करण्यासाठी येथे रोज येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राज्यात फॉर्मेलिनयुक्त मासे मिळतात हे गंभीर असून गोव्यात आवश्यक साधनसुविधाच नाही असे इजिदोर फर्नाडिस म्हणाले.
राज्यात विविध प्रकारचे कॅन्सर रुग्ण वाढत आहेत, असे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले. फॉर्मेलिनच्या विषयावर कायमस्वरुपी तोडगा हवा. गोव्यात मासळीचे उत्पादन खूप होते. प्रचंड ताजी मासळी गोव्याहून निर्यातीसाठी परराज्यात व विदेशात जाते, असे आलेमाव यांनी सांगितले. सीमेवर ट्रकांमधील मासळी रोज तपासली जावी. जी मासळी फॉर्मेलिनयुक्त नाही व सुरक्षित आहे अशा मासळीवरील ट्रकावर मासळी सुरक्षित असल्याचा टॅग लावला जावा, अशी मागणी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केली.
आम्हाला विधानसभा कामकाजात व्यत्यय आणण्याची इच्छा नव्हती पण पंधरा लाख गोमंतकीयांच्या आरोग्याचा विषय असताना सरकार स्थगन प्रस्तावावर चर्चेस तयार झाले नाही, तेव्हा आम्हाला स्वस्थ बसवले नाही. सरकार आता जी चर्चा करत आहे, तिच चर्चा पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तर तासापूर्वी केली असती तर बरे झाले असते, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले. आमचे कुठलेच आमदार माशांच्या धंद्यामध्ये नाहीत. काँग्रेसचे तरी दोन-तीन आमदार मासळी धंद्याशीनिगडीत आहेत. त्यांनी व्यवसाय करण्यात काहीच वाईट नाही पण त्यांनी फॉर्मेलिन माशांचा विषय यापूर्वीच्या काळात सरकारच्या नजरेस आणून द्यायला हवा होता, असे भाजपचे आमदार राजेश पाटणोकर म्हणाले.
लोबो यांचा इशारा
फॉर्मेलिन मासेप्रश्नी आम्हाला न्यायालयीन चौकशी हवी, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी केली. अगोदर निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून घ्या व मग कायमस्वरुपी चौकशी आयोग नेमा, अशी मागणी काँग्रेसचे नावेलीचे आमदार लुईङिान फालेरो यांनी केली. प्रतापसिंग राणो, टोनी फर्नाडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, अॅलिना साल्ढाणा, दयानंद सोपटे आदी अनेकांनी यावेळी आपली मते व्यक्त केली. फॉर्मेलिनचा विषय गंभीर घ्या, आम्ही सगळे गंभीर झालो नाही तर आम्हा चाळीसही आमदारांवर लोक विश्वास ठेवणार नाहीत असा इशारा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिला. पन्नास व्यक्तींमध्ये कॅन्सरचा एक रुग्ण सापडतोच. चाळीस वर्षे वयाच्याही एका तरूणाला दोन दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला, असे लोबो यांनी सांगितले.