लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून लोकमतने वाचक, सखी मंच सदस्य, विक्रेते, जाहिरातदार आणि हितचिंतकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तीन दिवशीय योग शिबिराचा उत्साहात समारोप झाला.
पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस या शिबराचे आयोजन करण्यात आले होते. योगगुरु श्रद्धा चंद्रकांत परब आणि वैष्णवी परब यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले. साखळीच्या योगसंगीनी ग्रुपच्या सदस्य अश्विनी मंजू शीतल देसाई स्वाती वेंगुर्लेकर, भूमिका गावडे, रोहिणी काणेकर, संजना मांजरेकर, संगीता सावंत, रसिका भजे यांनी योगप्रात्यक्षिके सादर केली.
आपल्या व्यग्र दिनचर्येतून काही वेळ काढून कोणती आसने करता येतील, आपल्या मनावरचा ताण हलका होण्याबरोबरच, दिवसभर उत्साही कसे वाटेल याचे मार्गदर्शनही या शिबिरात झाले. महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक भवानीदास मणेरकर यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.
काही वेळ तरी स्वतःसाठी द्या
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वस्थता, मानसिक शांतता मिळणे कठीण झाले आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणेही कठीण झाले आहे. अशावेळी आपल्या दैनंदिन आयुष्यात योगाचा कसा समावेश करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.