पणजी : राज्यातील केबल टीव्ही आॅपरेटरनी ‘ट्राय’च्या आदेशास आक्षेप घेतला असून ग्राहकांना ३00 रुपयांऐवजी ८00 ते ९00 रुपये भरावे लागतील, असा दावा करीत या अन्यायकारक आदेशाविरुद्ध प्रसंगी काही तासांकरिता ब्लॅकआउट करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत केबल टीव्ही नेटवर्किंग अॅण्ड सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशनचे संयुक्त सचिव मायकल कारास्को म्हणाले की, १३0 रुपये मूळ शुल्कात १00 चॅनल देण्याचे आमिष दाखवण्यात आले असले तरी हे चॅनल्स टुकार आहेत. कोणीच ते पाहत नाहीत. नंतरच्या प्रत्येक चॅनलला १९ रुपये भरावे लागतील. सध्या आम्ही ३00 रुपयांच्या पॅकेजमध्ये जे चॅनल्स देतो त्यासाठी ५00 रुपये मोजावे लागतील. गोव्यात सोनी, स्टार, झी टीव्हीचे चॅनल्स बघणा-यांची संख्या जास्त आहे. अतिरिक्त प्रत्येक चॅनलला १९ रुपये भरवावे लागणार असल्याने ग्राहकांना ते महागात पडेल. केबल आॅपरेटर्सना त्यानुसार आपले शुल्क वाढवावे लागेल.’
‘ट्राय’चा आदेश आजपासून अंमलात येणार होता परंतु ही अंमलबजावणी आता लांबणीवर टाकण्यात आली आहे. असे असले तरी ग्राहकांनी जागरुक व्हावे, असे कारास्को म्हणाले. महाराष्ट्रात गेले दोन दिवस केबलवाल्यांना प्रक्षेपण बंद करुन ब्लॅकआऊट केला परंतु आम्ही येथे तसे पाऊल उचललेले नाही. केंद्राच्या या आदेशात राज्य सरकारने हस्तक्षेप करुन न्याय द्यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतु जर न्याय न मिळाला तर काही तास गोव्यातही ब्लॅकआऊट करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
मिळालेल्या माहितीनुसार या संघटनेशी सुमारे २00 केबल आॅपरेटर्स संलग्न असून दीड लाख घरांना केबल जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.