पणजी : लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकायला हवेत, असे लक्ष्य समोर ठेवून गोवाभाजपा तयारी करत असताना दुस-या बाजूने मात्र सत्ताधारी घटक पक्षात आणि भाजपा संघटनेंतर्गत वाद उफाळून आलेले असल्याने भाजपासाठी सध्याचा काळ हा खूप तापदायी ठरलेला आहे. सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीला आपला पाठिंबा यापूर्वी दिलेले अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपाला चिंतीत केले आहे. दुस-या बाजूने पाच विधानसभा मतदारसंघांमधील भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या आमदाराला मंत्रिपद न मिळाल्याने टीका चालवली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. ते कुंभारजुवे, डिचोली, कळंगुट आदी मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांना भेटले. आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होऊ नका, लोकसभा निवडणुकीनंतर तुमच्या आमदाराचा विचार केला जाईल, असे तेंडुलकर यांनी कार्यकत्र्याना सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराविषयीच्या तक्रारी घेऊन प्रसार माध्यमांकडे जाऊ नका, असा सल्लाही तेंडुलकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. माजी मंत्री व ज्येष्ठ भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी तर दोन पाऊले पुढे टाकत आपण यापुढे लगेच प्रदेश भाजपाच्या कोअर टीमच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आपले मंत्रिपद काढले गेल्याने आपला भाजपाने विश्वासघात केला असे डिसोझा यांना वाटते. ते सध्या अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत.
भाजपाचे हळदोणोचे आमदार ग्लेन तिकलो, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकताच संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांमधील असंतोष असा उफाळून येणे योग्य नव्हे, अशी चर्चा भाजपाच्या कोअर टीममध्ये सुरू आहे. उत्तर गोव्यातील दोन मतदारसंघांमधील आमदारांची मंत्रिपदे काढून दक्षिण गोव्यातील दोघा भाजपा आमदारांना ती दिली गेली. यामुळे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघावर परिणाम होत असल्याचे बार्देश व डिचोली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपल्या आमदाराना मंत्रिपद किंवा महत्त्वाचे सरकारी महामंडळ दिले नाही तर आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला सहकार्य करणार नाही असा इशारा सांगे मतदारसंघातील विविध सरपंचांनी तथा आमदार प्रसाद गावकर यांच्या समर्थकांनी दिला आहे. आमदार गावकर यांनी सरकारवरील व भाजपावरील दबाव वाढविण्यासाठी नुकताच वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामाही दिला.
दरम्यान, गोव्याती दोन्ही लोकसभा मतदारसंघ 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने जिंकले. आता 2019 सालच्या निवडणुकीवेळीही गोव्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपने जिंकायला हवेत असे लक्ष्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी श्रीपाद नाईक व नरेंद्र सावईकर या दोन्ही खासदारांना ठरवून दिले आहे. भाजपाने नुकताच केलेला मंत्रिमंडळ विस्तार हा गोव्याच्या हिताचा आहे, असे विधान खासदार सावईकर यांनी नुकतेच केले आहे.