‘ईव्हीएम’बाबत संभ्रमपणजी : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत घोळ निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्यामुळे गोव्यातील काही प्रमुख उमेदवारांनी ईव्हीएम यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ईव्हीएम यंत्रांमधील मतांची मोजणी करतानाच व्हीव्हीपीएटी यंत्रामधील नोंदींचीही दखल घ्यावी व कुणाही उमेदवाराने फेरमतमोजणी मागितल्यास ती विनंती त्वरित मान्य व्हावी, अशी मागणी आमदार व काही उमेदवार करत आहेत.गेल्या ४ फेब्रुवारी रोजी गोव्यातील ४0 मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरू होती, तेव्हा ४ फेब्रुवारी रोजी अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड असल्याचा अनुभव आला. त्या वेळी निवडणूक यंत्रणेने झटपट ती यंत्रे बदलली. आके-मडगाव येथे तर बुथ क्रमांक आठवर इलेक्ट्रॉॅनिक यंत्रामधील बिघाडामुळे मतदान प्रक्रिया रद्द करून फेरमतदान घ्यावे लागले होते. या वेळी मतदान प्रक्रियेवेळी जेवढ्या संख्येने यंत्रांमध्ये बिघाड आढळून आला, तेवढा बिघाड कधी आढळला नव्हता. अर्थात त्याविरुद्ध लगेच निवडणूक यंत्रणेने उपाययोजना केल्यामुळे वाद निर्माण झाला नाही.या वेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून, आमदार व उमेदवारांकडून वेगळा सूर ऐकू येत आहे. मतमोजणीची प्रक्रिया अवघ्या ४८ तासांवर आलेली आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीसाठी येत्या शनिवारी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एखाद्या उमेदवारास दिलेले मत दुसऱ्याच उमेदवाराच्या पारड्यात जाण्याचा प्रकार घडल्याची चर्चा सोशल मीडियावर गाजल्यामुळे गोव्यातील उमेदवारांनी धसका घेतला आहे. भाजपच्या उमेदवारांमध्ये मोठीशी चिंता नाही. विरोधी काँग्रेस व अपक्ष उमेदवार शंका व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगालाही आपल्या शंका राजकीय पक्षांनी यापूर्वी कळविल्या आहेत.जर एखाद्या उमेदवाराने फेरमतमोजणी मागितली, तर ती लगेच मान्य करून फेरमतमोजणी करायला हवी, अशी मागणी राजकीय पक्ष व उमेदवार करत आहेत. अपक्ष उमेदवार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच मगोपचे आमदार व अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना तशीच मागणी केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसोबतच व्हीव्हीपीएटी यंत्रांमधील कागदांद्वारे झालेले मतदानही मोजणीसाठी घेतले जावे. दोन्हींची मोजणी ही एकाचवेळी केली जावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी केली आहे. युनायटेड बहुजन आॅफ गोवा या पक्षानेही तशीच मागणी केली आहे.दरम्यान, ईव्हीएम यंत्रांबाबत आम्हाला शंका नाही. जर एखाद्या बुथवरील मतदानाविषयी मोजणीनंतर उमेदवारास शंका आली, तर त्वरित अर्ज करून त्या बुथापुरती फेरमतमोजणी करून घेता येईल; पण सरसकट सगळीकडेच फेरमतमोजणी घेण्याची गरज नाही, असे मत भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले. (खास प्रतिनिधी)
‘ईव्हीएम’बाबत संभ्रम
By admin | Published: March 09, 2017 2:09 AM