महाराष्ट्रात गोवा विलीन करू पाहणार्यांसोबत कॉंग्रेसची युती दुर्दैवी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:41 PM2020-03-04T17:41:43+5:302020-03-04T17:42:08+5:30
चर्चिल आलेमाव यांची टीका: अशा पक्षाशी राष्ट्रवादी संबंध ठेवणार नाही
मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेस पक्षाने मगो पक्षाबरोबर युती करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी टीका करताना , ज्या पक्षाने गोव्याचे विलींनीकरण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला त्याच मगोशी कॉंग्रेस युती करते ही दुर्दैवाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी गोव्यात अशा कॉंग्रेसशी युती करू पाहत नाही असे ते म्हणाले.
यावर प्रतिवार करताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सध्या चर्चिलची युती नेमकी कुणा बरोबर आहे आणि भाजपा मुख्यमंत्र्याबरोबर असलेले साठेलोटे बाणावालीकरांनाच नव्हे तर सगळ्या गोवेकरांना माहीत आहेत असे म्हटले. चोडण कर म्हणाले, आम्ही कुठल्याही पक्षाकडे युती केलेली नाही. पण भाजपला रोखण्यासाठी ज्या ठिकाणी आमच्याकडे बलवान उमेदवार नाहीत तिथे आम्ही दुसर्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बुधवारी कोलवा, बाणावली व कुड्तरी या तीन जिल्हा पंचायत मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरले . यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुजे फिलिप डिसोझा हेही उपस्थित होते. बाणावलीतून मिनिन फेर्नादिस ,कोलव्यातून वानिया बाप्तिस्ता व कुडतरीतून सरिता फेर्नादिस या तिघांनी अर्ज भरले.
यावेळी बोलताना जुजे फिलिप डिसोझा यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी किमान दहा उमेदवार उतरविणार असे सांगितले. उत्तर गोव्यातही आमचे उमेदवार असतील असे ते म्हणाले.