गोव्यातही काँग्रेसचे उद्या उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 01:13 PM2018-04-08T13:13:27+5:302018-04-08T13:13:27+5:30
अखिल भारतीय काँग्रेस समितीने जातीय सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात आयोजित केलेल्या उपोषणात गोव्यातील काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.
पणजी - अखिल भारतीय काँग्रेस समितीने जातीय सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात आयोजित केलेल्या उपोषणात गोव्यातील काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. येथील आझाद मैदानावर उद्या सोमवारी ९ रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यकर्ते उपोषण करतील.
प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतीच प्रदेश काँग्रेस समिती व काँग्रेस विधिमंडळ पक्षाची संयुक्त बैठक झाली. विधिमंडळ पक्षनेते बाबू कवळेकर हेही या बैठकीला उपस्थित होते. भाजप नेते देशात फूट घालू पहात आहेत आणि केंद्रीय मंत्री यात निर्लज्ज भूमिका बजावत आहेत, असा आरोप शांताराम यानी केला. हिंदूंची लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार अपत्यांना जन्म द्यावा, जे आवाहन भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे त्याची शांताराम यांनी निंदा केली. भाजपचे मंत्री निरंजन ज्योती यांनी तर त्यापुढेही जाऊन निवडणुकीत ‘रामजादे’की ‘हरामजादे’ निवडायचे हे ठरवा, असे आवाहन लोकांना केले असल्याचे नमूद करुन शांताराम यांनी निरंजन यांच्या या वक्तव्याचाही धिक्कार केला. ते म्हणाले की, आणखी एका मंत्र्याने नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जावे, असे आवाहन केले आहे. काही काळापूर्वी साध्वी सरस्वती गोव्यात आल्या असता त्यानी जाहीर सभेत जे बीफ खातात त्याना भर चौकात फासावर लटकवायला हवे, असे विधान केले होते, असे शांताराम यांनी नमूद केले. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया यांनी ख्रिस्ती व मुस्लिमांना राहू आणि केतू असे संबोधले होते याचीही आठवण शांताराम यांनी करुन दिली आणि एकूण धार्मिक फूट घालण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप केला.
पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर यांनीही भाजप समाजात फूट घालत असल्याचा आरोप केला. देशातील जनता वैफल्यग्रस्त बनली आहे. त्यामुळे उद्या जरी निवडणुका घेतल्या तरी काँग्रेस सत्तेवर येईल, असे ते म्हणाले. या संयुक्त बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, डॉ. प्रमोद साळगांवकर, शंभू भाऊ बांदेकर, ऊर्फान मुल्ला व सगुण वाडकर यांची भाषणे झाली.